मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम आहे. प्रवेश नियंत्रण समितीकडून सोमवारी २४ सप्टेंबरला तिसरी प्राधान्य फेरी पार पडली. मात्र, त्यात एकूण किती प्रवेश झाले, हे प्रवेश समिती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नाही. दरम्यान, सोमवार, मंगळवारी प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांच्या लांबच लांब रांगा उपसंचालक कार्यालयाबाहेर पाहायला मिळाल्या. शेवटच्या प्राधान्य फेरीतही प्रवेश न मिळाल्याने शेकडो एटीकेटी आणि अद्याप कोठेही प्रवेश न मिळालेले विद्यार्थी आपल्या समस्या घेऊन आले होते. १५०हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशाची आणखी एक फेरी आयोजित करावी, यासाठी लेखी अर्ज दिले.आतापर्यंत अकरावी प्रवेशाच्या ४ फेºया, एक विशेष फेरी आणि तीन प्राधान्य फेºया पार पडल्या आहेत. तिसरी प्राधान्य फेरी ही शेवटची फेरी असल्याचे प्रवेश समितीने जाहीर केले. त्यासंबंधीचे वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर केले. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याच्या मुदतीत अर्ज भरलेच नसल्याचे समोर आले आहे, तसेच काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. मात्र, चुकीची माहिती भरल्यामुळे त्यांचे लॉगइन आयडी न उघडल्याने त्यांच्या प्रवेशाची संधी हुकली आहे.अकरावी प्रवेश प्रक्रिये अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले होते. मात्र, आता शाखा बदली करायची आहे, असे सांगत त्यांनी प्रवेश नाकारले आहेत. एटीकेटीच्या अनेक विद्यार्थ्यांनी तर प्रवेश अर्जच भरले नाहीत. त्यामुळे आता प्रवेश मिळणार कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. त्यामुळेच अकरावीसाठी अद्याप प्रवेश न मिळालेल्या अशा अनेक विद्यार्थी, पालकांनी उपसंचालक कार्यालयाबाहेर रांगा लावलेल्याचे चित्र पाहायला मिळाले.प्रवेशाचा गोंधळ लक्षात घेता आता अकरावी प्रवेशासाठी प्रवेश समितीकडून आणखी एक संधी देण्यात यावी, यासाठीही अनेक विद्यार्थी, पालकांनी उपसंचालक कार्यालयायकडे लिखित अर्ज केले. तब्बल १५० हून अधिक अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया समिती काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 6:51 AM