अकरावी प्रवेशाची सीईटी अडकली मराठीच्या वादात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:43 AM2021-06-27T06:43:19+5:302021-06-27T06:43:57+5:30
मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहित यासंदर्भात तक्रार केली आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश असताना मराठी भाषेलाच का डावलले, असा सवाल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावीसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, यासाठी चार विषयांची परीक्षा होणार असून या परीक्षेत मराठी भाषेचा पर्याय नसल्याने राज्य मंडळाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांसह मराठी भाषा संघटना, शिक्षक संघटनांमध्ये नाराजी आहे. अकरावी प्रवेशासाठी इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश असताना मराठी भाषेला का डावलले, असा त्यांचा सवाल आहे.
मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहित यासंदर्भात तक्रार केली आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश असताना मराठी भाषेलाच का डावलले, असा सवाल केला आहे. परीक्षेत मराठी विषयाला स्थान द्यावे किंवा मराठीसह सर्व विषय ऐच्छिक ठेवावे, ज्यांना ज्या विषयातून परीक्षा द्यायची असेल ते विषय विद्यार्थी निवडतील, अशी मागणीही या पत्राद्वारे केली आहे.
गांभीर्याने विचार करावा. मातृभाषेतून शिक्षणाचा पर्याय निवडलेल्या व प्रथम भाषा मराठी असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेऊ शकते. अशा विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाला सामाईक प्रवेश (सीईटी) परीक्षेत प्राधान्य देण्याचा विचार गांभीर्याने करावा, अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाचे सुशील शेजुळे व सुरेंद्र दिघे यांनी केली.
मुख्याध्यापकही आग्रही
मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार करता इंग्रजी भाषेचा पर्याय असेल तर मराठीचा पर्यायही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असावा, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी केली. मराठी विषयात विद्यार्थी अधिकाधिक गुण मिळवू शकतात, तर इंग्रजीत अनेकदा अनुत्तीर्ण होतात. त्यामुळे मंडळाने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून या सामाईक परीक्षेसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे.
अकरावी प्रवेशासाठीची सीईटी ही विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असली तरी सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. इंग्रजीचे व्याकरण सर्वत्र सारखे आहे. तर गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांची मूळ माहिती, संकल्पना सारख्याच असल्याने चाचपणी करून शिक्षण मंडळाने विचारपूर्वक या ४ विषयांची निवड केली आहे.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ