लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या मूल्यमापनाच्या आधारावर लागलेल्या निकालात छप्पर फाड के गुण मिळाल्यामुळे प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी न्यायालयाने रद्द केल्याने आता प्रवेश होणार तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. पॉलिटेक्निक आणि आयटीआयप्रमाणे आता अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांवर होणार असल्याने नामवंत महाविद्यालयांची कटऑफ ९०-९५ टक्क्यांच्या वर पोहोचेल आणि प्रवेशासाठी काँटे की टक्कर होणार हे मात्र निश्चित झाले आहे.
मुंबई विभागाचा दहावीचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. या विभागात १ लाख १० हजार ९७९ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून, तर एक लाख ५९ हजार ८११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. एकूणच मुंबई विभागात एकूण ३,४७,६६७ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ३,४७,५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबई विभागात ३.२४ टक्के विद्यार्थी जास्त उत्तीर्ण झालेले आढळतात. जरी ही टक्केवारी अगदी अल्प प्रमाणात दिसत असली तरी विद्यार्थ्यांना, त्यांना हवे असलेल्या महाविद्यालयात तथा विद्याशाखेत प्रवेश मिळवणे कठीण जाणार आहे हेही तितकेच खरे आहे, असे मत शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त प्राचार्य सुदाम कुंभार यांनी मांडले.
अकरावी प्रवेशाची स्पर्धा कशी असेल आणि काय होणार
-ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये वाढलेल्या गुणांमुळे कमी गुण प्राप्त केलेल्या मुलांना प्रवेश मिळणे कठीण असेल.
-सामान्यतः विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा कल जास्त दिसून येतो. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी मोठी रांग लागण्याची शक्यता आहे.
-३.२४ टक्के इतके जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी एकूण गुणांतील फरक पाहता प्रवेशासाठी खूप मोठी स्पर्धा असेल हे मात्र स्पष्ट आहे.
-विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या गुणांमुळे काही विद्यार्थी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम तसेच औद्योगिक (आय.टी.आय.) अभ्यासक्रमाकडे जाण्याची जास्त शक्यता आहे.
कोट
प्रत्यक्ष शाळेत न जाता घरी बसून केलेला अभ्यास आणि शाळेत जमा केलेले गृहपाठ यावर आधारित प्राप्त निकाल आणि नेहमीपेक्षा जास्त मिळालेल्या गुणांचा विचार करता अकरावी प्रवेशासाठीची ही स्पर्धा नक्कीच पालक आणि विद्यार्थ्यांना जेरीस आणणारी असेल.
सुदाम कुंभार, निवृत्त प्राचार्य, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी
----
कट ऑफ वाढणार असल्याने विद्यार्थी चिंतेत
अकरावी प्रवेशासाठी सीईटी नसणे समाधानकारक असले तरी आता प्रवेशाच्या स्पर्धेची चिंता आहेच. अनेकांना नव्वदीपार गुण आहेत. त्यामुळे कोणत्या फेरीत हव्या त्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळेल की नाही हे सांगता येणार नाही.
धनश्री कुलकर्णी, विद्यार्थिनी
आम्हाला दहा महाविद्यालयांची नावे प्रवेशासाठी द्यायची आहेत, मात्र त्यातही आमचा क्रमांक कोणत्या फेरीत लागेल याची माहिती आम्हाला नसणार आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयासाठी न जाता यंदा कनिष्ठ महाविद्यालयाचा पर्याय निवडण्याचा विचार आहे.
आकाश सहासाळुंखे , विद्यार्थी
-------------
मुंबई विभागातील अकरावी प्रवेशाच्या मागील वर्षीच्या जागा
शाखा- एकूण प्रवेश क्षमता- केंदीय फेरीत निश्चित प्रवेश- कोट्यामधील प्रवेश- एकूण प्रवेश
कला - ३७३००- १७८५३- ४२६१- २२११४
वाणिज्य - १७३८८०- ९९६७९- ३०६१९- १३०२९८
विज्ञान- १०३९१०- ५३६२३- १४५४४- ६८१६७
एचएसव्हीसी - ५६६०- २७२६- ३४६- ३०७२
एकूण - ३२०७५०- १७३८८१- ४९७७०- २२३६५१