अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:00 AM2020-11-27T04:00:01+5:302020-11-27T04:00:01+5:30

दुसरी गुणवत्ता यादी ५ डिसेंबरला : प्रवेश निश्चिती ९ डिसेंबरपर्यंत करता येणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या अडीच ...

Eleventh online admission process from today | अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून

Next

दुसरी गुणवत्ता यादी ५ डिसेंबरला : प्रवेश निश्चिती ९ डिसेंबरपर्यंत करता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या अडीच महिन्यांहून अधिक काळ रखडलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून २६ नोव्हेंबरपासून ती सुरू हाेईल. सद्यस्थितीत शिक्षण संचालनालयाने नियमित फेरी २ चे वेळापत्रक जाहीर केले असून, नियमित फेरी ३ व विशेष फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क, प्रवेश निश्चिती ऑनलाइन करायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या https://mumbai.11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. मुंबई एमएमआर क्षेत्रासह, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे प्रवेश या वेळापत्रकानुसारच हाेतील.

यापूर्वी एसईबीसी वर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर वर्ग बदलाची संधी देण्यात येईल. नियमित फेरी २ साठी विद्यार्थ्यांना या दरम्यान अर्ज करायचे असून, त्यांना पसंती क्रमही बदलता येतील. ५ डिसेंबर सकाळी ११.३० वाजता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून, दुसऱ्या नियमित फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर पाहता येतील. ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना यादीप्रमाणे महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करता येईल. याच दरम्यान महाविद्यालयांतील व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरू राहणार आहेत.

दरम्यान झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ दिला जाईल. १० डिसेंबर रोजी तिसऱ्या नियमित फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल.

* मुंबई विभागात पहिल्या फेरीपर्यंत निश्चित झालेले शाखानिहाय प्रवेश

शाखा -एकूण जागा - पहिल्या यादीत अलॉट जागा - प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी

विज्ञान- ६६,७९१ - ३७,९७६- १९,८६१

वाणिज्य- १०,५१६०- ६६,१४०- २६,०९७

कला- २४,१७६- १२,५०२- ६,७१४

एचएसव्हीसी - ३,८९३- ९०२- ७११

एकूण- २,००,०२० - १,१७,५२०- ५३,३८३

Web Title: Eleventh online admission process from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.