एसईबीसी विद्यार्थ्यांना अर्जात बदल करण्यासाठी मुदतवाढ
मुंबई : अकरावीच्या विशेष फेरीच्या जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष फेरीच्या गुणवत्ता यादी व अलॉटमेंटला स्थगिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी २४ डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तिसऱ्या फेरीनंतर मुंबई विभागात अद्याप कोट्याच्या जागा वगळून तब्बल १ लाख ४८ हजार ३८६ जागा रिक्त आहेत. विशेष फेरीची गुणवत्ता यादी २८ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रवेश घेतले आहेत, मात्र आता रद्द करायचे आहेत त्यांना या फेरीत ते रद्द करता येतील व लगेचच विशेष फेरीसाठी अर्ज करता येतील.
मुंबई विभागात अकरावीच्या एकूण ३ लाख २० हजार ३९० जागा उपलब्ध असून तिसऱ्या प्रवेश फेरीअंती आतापर्यंत केवळ १ लाख ३५ हजार ४६६ प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. म्हणजेच तिसऱ्या प्रवेश फेरीनंतर आतापर्यंत मुंबई विभागातून केवळ ४२ टक्के प्रवेशनिश्चिती झाली.
* ‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी अद्याप निर्णय नाही
दहावी, बारावीच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या पुरवणी परीक्षांचा निकाल राज्य मंडळाने नुकताच जाहीर केला. मात्र अद्याप या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही सूचना जारी केलेल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची विशेष फेरीत उपलब्ध महाविद्यालयातील जागांची संधी हुकणार असल्याने अनेक विद्यार्थी नाराज आहेत. विशेष फेरीनंतर राहिलेल्या जागांवर या विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
..............................................