अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:39 AM2018-05-10T05:39:19+5:302018-05-10T05:39:19+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा मुंबईत आजपासून सुरू होत असून, त्या संदर्भातील सूचना मुंबई विभागातर्फे परिपत्रक जारी करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी प्रवेश आणि त्यातील नियम याबाबत मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, प्रवेशाबाबतच्या ‘माहिती पुस्तिकां’चे वाटप करण्यात आले आहे.
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा मुंबईत आजपासून सुरू होत असून, त्या संदर्भातील सूचना मुंबई विभागातर्फे परिपत्रक जारी करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी प्रवेश आणि त्यातील नियम याबाबत मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, प्रवेशाबाबतच्या ‘माहिती पुस्तिकां’चे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून विद्यार्थी अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर अर्जाचा पहिला भाग भरू शकणार आहेत. माहिती पुस्तिकेतील युजर आयडी व पासवर्डचा वापर करून सूचनांनुसार विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील माध्यमिक शाळांतील, तसेच अन्य बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांनी आॅनलाइन भरून अप्रूव्हलसह पूर्ण करण्याच्या सूचना उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. यंदाचा दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर होईपर्यंत पालक व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावून शाळा स्तरावर ही कार्यवाही पूर्ण करायची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल घोषित झाल्यापासून पुढील १० दिवसांत आॅनलाइन अर्जाचा भाग १ व भाग - २ भरण्याची कार्यवाही शाळेत जाऊन पूर्ण करायची आहे. यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवण्याच्या सूचना उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.
प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरताना, दहावीचा बैठक क्रमांक टाकल्यानंतर राज्य मंडळाकडे उपलब्ध असलेली माहिती तेथे दिसेल. त्यात बदल करायचे असल्यास, विद्यार्थ्यांना प्रोफाइलवर जाऊन बदल सेव्ह करावे लागतील. तसेच ते शाळेकडून अप्रूव्ह करून घ्यावे लागतील. हीच कार्यवाही वैधानिक व विशेष आरक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना भाग-२ भरता येणार आहे.
असा करा अर्ज...
पहिल्यांदा लॉगइन करताना माहिती पुस्तिकेत दिलेले
लॉगइन आणि पासवर्ड वापरा.
संगणक आणि माहिती पुस्तिकेतील सर्व सूचना नीट वाचून अर्ज भरा.
अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर ‘कन्फर्म’ या बटणावर क्लिक करा. अन्यथा अर्ज प्रवेश प्रक्रियेत गृहीत धरण्यात येणार नाही.
आॅनलाइनसाठी संकेतस्थळ
http://mumbai.11thadmission.net