Join us

अकरावीची मार्गदर्शक आॅनलाइन प्रवेश पुस्तिका वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 5:30 AM

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने छापलेली इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठीची संपूर्ण माहिती असलेली

मुंबई/डोंबिवली : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने छापलेली इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठीची संपूर्ण माहिती असलेली पुस्तिका आणि नमुना अर्ज याची किंमत मुंबई आणि अन्य विभागांकरता वेगवेगळी असल्याचे उघड झाले आहे. मुंबईसाठी २५० तर अन्य विभागांसाठी १५० रुपये असे त्याचे शुल्क आहे. मुंबईला ही पुस्तिका महाग देण्याचे कारण शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले नाही. मात्र, १०० रुपये जास्त आकारून दीड कोटी रुपये नफा कमावण्याचा उद्देश सरकारचा असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.मुंबई विभागातील विद्यार्थ्यांना ही पुस्तिका २५० रुपयांना मिळत असली तरी त्यातील २२० रुपये सरकार दरबारी जमा होतील. ३० रुपये शाळांना मिळणार आहेत. अन्य विभागांत १२० रुपये सरकारकडे जमा होतील, तर तेथे शाळांना ३० रुपये मिळणार आहेत. सरकारने मुंबई व अन्य विभागाच्या पुस्तिकेच्या किमतीत १०० रुपयांचा फरक का ठेवला, असा सवाल विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केला होता. याबाबत त्यांनी शिक्षण संचालकांना विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर पंडित यांना मिळालेले नाही.यंदाच्या वर्षी पुस्तिकेचा आकार लहान आहे. मुंबईसह सर्व विभागांसाठी पुस्तिका सारखीच असताना किमतीत मात्र फरक केला आहे. मुंबईसाठी जास्त किंमत असल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. सरकारला मुंबईतील विद्यार्थ्यांकडून जास्तीचा नफा कमवायचा आहे, असा टीकेचा सूर पालकांमध्ये आहे. आॅनलाइन प्रवेश पुस्तिकेच्या किमतीत समानता दिसत नाही, ते सरकार शिक्षणात समानता कशी आणणार, अशी संतप्त प्रतिक्रियाही शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.नाराजीचा सूरमुंबईच्या पुस्तिकेची किंमत जास्त आणि आकार लहान, असा उफराटा प्रकार आहे. या वर्षी पुस्तिकेऐवजी महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तकाचा आकार लहान झाला आहे, तरीही किंमत जास्त का, त्यातच मुंबईला वेगळे दर का आकारण्यात आले, सरकारच्या शिक्षण खात्याने असा भेदभाव का केला आहे, त्याचे कारणही स्पष्ट केले जात नाही. मुंबई विभागातून जवळपास १५ लाख विद्यार्थी ११ वीच्या आॅनलाइन पुस्तिका भरतात. एका विद्यार्थ्याकडून शंभर रुपये जादा घेण्यात येणार असल्याने सरकारच्या तिजोरीत दीड कोटी रुपये जमा होणार आहेत. मुंबईतील विद्यार्थ्यांकडून १०० रुपये जादा घेण्यामागील कारण शिक्षण विभागाने स्पष्ट न केल्याने विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालय आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.१० महाविद्यालयांचीच नावे भरानवीन आॅनलाइन मार्गदर्शन माहिती पुस्तिकेत महाविद्यालयांची माहिती नाही. नेटवर जाऊन त्यांची साइट शोधावी लागते. यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील ३५ महाविद्यालयांची नावे भरावी लागत होती. आता त्यांना केवळ १० महाविद्यालयांची नावे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे ३५ नावे भरण्यापासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे, ही एकच समाधानकारक बाब या पुस्तिकेत आहे.