दिल्लीच्या विद्यार्थिनीचा मुंबई विद्यापीठाविरोधात एल्गार, आज उच्च न्यायालयात सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:06 AM2017-12-12T03:06:10+5:302017-12-12T03:06:52+5:30
दिल्लीतून मुंबईत विधि अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेवरील निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यापुढे उत्तरपत्रिकांसोबत पुरवणी पत्रिका मिळणार नसल्याचा निर्णय विद्यापीठाने ९ आॅक्टोबर रोजी घोषित केला होता.
मुंबई : दिल्लीतून मुंबईत विधि अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेवरील निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यापुढे उत्तरपत्रिकांसोबत पुरवणी पत्रिका मिळणार नसल्याचा निर्णय विद्यापीठाने ९ आॅक्टोबर रोजी घोषित केला होता. मात्र या निर्णयामुळे आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा दावा करत मानसी भूषण या विद्यार्थिनीने विद्यापीठाला कोर्टात खेचले आहे.
मानसीच्या याचिकेवर मंगळवारी, १२ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. मानसीने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शासकीय विधि महाविद्यालयात विधि अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षात ती शिकत आहे. चौथ्या वर्षात ती महाविद्यालयातून प्रथम आली होती. त्या वेळी प्रत्येक सत्रात असलेल्या चारही विषयांसाठी तिने उत्तरपत्रिकेला पुरवणी जोडली होती. अशा प्रकारे सुमारे ५०हून अधिक पानांची गरज तिला भासली होती. मात्र विद्यापीठाच्या नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना एक उत्तरपत्रिका वगळता कोणतीही पुरवणी पत्रिका मिळणार नाही. ४० पानांच्या उत्तरपत्रिकेत सर्व प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची, हेच विद्यार्थ्यांना कळत नाही.
यासंदर्भात मानसी म्हणाली की, याआधीच्या सत्रात मला प्रत्येक विषयाचा पेपर सोडवण्यासाठी ५०हून अधिक पानांची गरज भासली. माझ्या मैत्रिणींनाही संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रत्येकी ५२ आणि ५९ पानांची गरज होती. मात्र विद्यापीठाने आॅनलाइन पेपर तपासणीत अडचण येत असल्याचे कारण देत हा नवा नियम घोषित केला आहे. त्याबाबत विद्यापीठाला २४ आॅक्टोबर रोजी ३७ विद्यार्थ्यांच्या सहीसह निवेदन दिले होते. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा १७ नोव्हेंबरला स्मरणपत्र देण्यात आले. तरीही विद्यापीठाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने अखेर उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाने ६ डिसेंबरला याचिका दाखल करून घेत विद्यापीठाला म्हणणे मांडण्यास सांगितल्याचे तिने स्पष्ट केले.
केवळ ३६.५ पाने
मुळात ४० पानांच्या उत्तरपत्रिकेत पहिल्या पानावर विद्यार्थ्यांचे नाव व इतर माहिती लिहावी लागते. तर दुसºया पानावर सूचना दिलेल्या असतात. शेवटचे पान विद्यार्थ्यांना रफ वर्क आणि गुणांसाठी सोडावे लागते. तर ३९ क्रमांकाच्या अर्ध्या पानावर विद्यार्थ्यांना काहीही लिहिण्यास बंदी आहे. अशाप्रकारे ४० पानांच्या उत्तरपत्रिकेतील ३.५ पानांवर विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यास मिळत नाही. अर्थात केवळ ३६.५ पानांत सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची तरी कशी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
...मग संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची कशी?
विधि अभ्यासक्रमाच्या गतवर्षीच्या चौथ्या वर्षातील प्रश्नपत्रिकेत १० छोटे प्रश्न, ६ शॉर्ट नोट्स, ३ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि ६ दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश होता. त्यातील १०० गुणांसाठी किमान १० छोटे प्रश्न, ४ शॉर्ट नोट्स, २ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि ४ दीर्घोत्तरी प्रश्न सोडवावे लागले.
मात्र हुशार विद्यार्थी या प्रश्नांसह अतिरिक्त प्रश्नांची उत्तरेही लिहितात. त्यात एका दीर्घोत्तरी प्रश्नासाठी काही विद्यार्थ्यांना ७ ते ८ पाने लागतात. अशा परिस्थितीत केवळ मोठ्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास ३०हून अधिक पाने लागतात. परिणामी, उरलेल्या पानांत संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची तरी कशी, या तणावात विद्यार्थी असल्याचे मानसी भूषण हिने सांगितले.