डम्पिंगविरोधात पुन्हा एल्गार

By admin | Published: October 13, 2016 05:48 AM2016-10-13T05:48:03+5:302016-10-13T05:48:03+5:30

मुंबई महापालिकेच्या हरिओमनगरच्या डम्पिंगविरोधात बुधवारी मनसेने पुन्हा एल्गार पुकारला. शहर मनसेने सकाळीच आंदोलन करून कचऱ्याच्या तब्बल ४० गाड्या अडवून

Elgar Against Dumping | डम्पिंगविरोधात पुन्हा एल्गार

डम्पिंगविरोधात पुन्हा एल्गार

Next

ठाणे : मुंबई महापालिकेच्या हरिओमनगरच्या डम्पिंगविरोधात बुधवारी मनसेने पुन्हा एल्गार पुकारला. शहर मनसेने सकाळीच आंदोलन करून कचऱ्याच्या तब्बल ४० गाड्या अडवून त्या पुन्हा मुंबईकडे रवाना केल्या. मुंबई महापालिकेने येथील डम्पिंग येत्या दीड महिन्यात कायमचे बंद करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या हद्दीवर हरिओमनगर भागात मुंबई महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे. त्यावर जमा होणारा कचरा आणि दुर्गंधीचा त्रास येथील रहिवाशांना मागील कित्येक वर्षे सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने २००३ मध्ये निकाल देताना हे डम्पिंग हटवण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. परंतु,
आज १३ वर्षे उलटूनही ते हटवण्यात आलेले नाही. ते हटवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी, विविध राजकीय पक्षांनी अनेक वेळा आंदोलनेदेखील केली. परंतु, आज हलवू, उद्या हलवू, असे आश्वासन देऊन मुंबई महापालिकेने ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक केल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, हे डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा मनसेने आंदोलन केले. या वेळी अविनाश जाधव, समीक्षा मार्कंडे, रवींद्र मोरे, महेश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी येथे येणाऱ्या कचऱ्याच्या सुमारे ४० गाड्या अडवून त्या पुन्हा मुंबईकडे रवाना केल्या. या आंदोलनाची दखल घेऊन घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दाखल झाले. येत्या दीड महिन्यात येथून डम्पिंग हटवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती जाधव यांनी दिली. येत्या २५ तारखेला यासंदर्भातील निविदा उघडण्यात येणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Elgar Against Dumping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.