Join us

भाजप शासित राज्यांमधील महिला व अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 5:36 PM

Congress: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

मुंबई : भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व समाजाचे लोक सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी भाजपा सरकारे त्यांना पाठीशी घालत आहेत. या अत्याचाराविरोधात काँग्रेसने आवाज उठवला असून उद्या बु़धवार दि. ४ नोव्हेंबर रोजी महिला व समाजावरील अत्याचार विरोधी दिवस पाळला जाणार आहे. दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

भाजपाच्या अन्यायी व अत्याचारी सरकारांविरोधात चैत्यभूमीवर उद्या सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत धरणे आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित वाल्मिकी कुटुंबावर झालेले अन्याय अत्याचार देशाने पाहिले आहेत. या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे. उत्तर प्रदेशसह देशातील भाजपशासित राज्य सरकारे तसेच नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळात महिला व समाजावर अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात भाजपा सरकारे अपयशी ठरली आहेत. गुन्हेगारांना शासन देण्याऐवजी या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम भाजप सरकारकडून होत आहे. या निर्ढावलेल्या भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडित कुटुंबांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे. कोल्हापुरात गुरुवारी ५ नोव्हेंबरला भव्य ट्रॅक्टर रॅली...मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा लढा सुरुच असून याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून कोल्हापुरमध्ये गुरुवारी ५ नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे. शुक्रवारी ६ नोव्हेंबरला सांगली येथे भव्य ट्रॅक्टर रॅली-६ नोव्हेंबर रोजी सांगली येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याविरोधात भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे.काँग्रसने शेतकरी, कामगार कायद्याविरोधात संघर्षाची मशाल पेटवली असून उद्योगपती धार्जिण्या शेतकरी व कामगार कायद्याविरोधात व्हर्च्युअल शेतकरी महारॅली आयोजित करून मोदी सरकारच्या अन्यायी कायद्यांना कडाडून विरोध करण्यात आला. त्यानंतर किसान अधिकार दिवस पाळण्यात आला. आता टॅक्टर रॅली काढून हा विरोध आणखी तीव्र केला जात आहे. जोपर्यंत मोदी सरकार हे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहणार आहे, याचा पुनरूच्चार थोरात यांनी केला.

टॅग्स :काँग्रेसदलितांना मारहाणभाजपाविनयभंगबाळासाहेब थोरात