एल्गार परिषद प्रकरण; गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावर उत्तर द्या, उच्च न्यायालयाचे एनआयएला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:57 AM2020-09-05T07:57:43+5:302020-09-05T07:57:58+5:30
आपल्याला अटक करून ९० दिवस उलटले तरी एनआयएने अद्याप दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे कायद्याने आपली जामिनावर सुटका करण्यात यावी, असे नवलखा यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.
मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने एनआयएला नोटीस बजावत दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.
आपल्याला अटक करून ९० दिवस उलटले तरी एनआयएने अद्याप दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे कायद्याने आपली जामिनावर सुटका करण्यात यावी, असे नवलखा यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. याच आधारावर नवलखा यांनी विशेष एनआयए न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, १२ जुलै रोजी विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्या निर्णयाला नवलखा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, एनआयएने त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. नवलखा यांची याचिका दाखल करून घेण्याजोगी नाही. कारण विशेष न्यायालयाने एनआयएला दोषारोपपत्र सादर करण्यासाठी ९० दिवसांची मुदत वाढवून १८० दिवसांपर्यंत दिली आहे, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले. नवलखा यांनी केलेल्या याचिकेनुसार, २८ आॅगस्ट २०१८ ते १ आॅक्टोबर २०१८ पर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवले होते. ते ३४ दिवस ही एकप्रकारे अटक होती. आपल्याला ९० दिवसांहून अधिक दिवस उलटूनही दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे कायद्याने जामिनावर सुटका करणे बंधनकारक आहे.
नवलखा हे सध्या तळोजा कारागृहात आहेत. १४ एप्रिल रोजी ते दिल्लीत एनआयएपुढे शरण गेले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे केल्याने १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या सभेला माओवाद्यांचा पाठिंबा होता.