मुंबई : शहरी नक्षलवाद व एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ कवी वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेराज्य सरकार व एनआयएला दिले आहेत. तसेच त्यांचे कुटुंबिय अंतर राखून त्यांना भेटू शकतात का? अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली.राव यांची प्रकृती खालावली असून ते मृत्यूशय्येवर आहेत, असे राव यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ८१ वर्षांचे राव यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. राव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यांना अन्य आजार असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. राव यांच्या प्रकृतीची माहिती देण्याचे निर्देश देत न्यायालयाने राव यांचे कुटुंबिय त्यांना दुरून भेटू शकते का? अशी विचारणा राज्य सरकार व एनआयएकडे केली. याचे उत्तर २२ जुलैपर्यंत देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.'जे. जे. रुग्णालयात असताना राव यांनी खाटेला डोके आपटले. त्यांना गंभीर दुखापत झाली. कोरोना व्यतिरिक्त त्यांना अनेक आजार आहेत. त्यांचे हे शेवटचे दिवस आहेत. जर त्यांना मृत्यू येणार असले तर त्यांच्या कुटुंबियांसमोर येऊ दे,' असे राव यांच्या वकिलांनी म्हटले. तसेच त्यांची जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली. तपासामध्ये व्यत्यय आणण्याच्या स्थितीत नाहीत, हे एनआयएला माहीत आहे, असे राव यांच्या वकिलांनी म्हटले.त्यावर न्यायालयाने राव यांच्या वकिलांना प्रतिप्रश्न केला की, राव यांची प्रकृती इतकी गंभीर आहे तर त्यांना रुग्णालयातून अन्य ठिकाणी हलविणे योग्य आहे का? आणि त्यांना कोरोना आहे तर ते त्यांच्या कुटुंबियांना कसे भेटणार? प्रशासनाने परवानगी दिली तर राव यांचे कुटुंबिय सर्व खबरदारी घेऊन अंतर राखून राव यांना भेटतील,असे राव यांच्या वकिलांनी म्हटले. कोरोनाच्या रुग्णांना भेटून दिले जात नाही, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली. तर सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी राव यांच्या कुटुंबियांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे राव यांची भेट घडवून देऊ, असे न्यायालयाला सांगितले. राव यांच्यावर मुंबईतल्या खूप चांगल्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, असे ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने राव यांचे कुटुंबिय अंतर राखून राव यांना भेटू शकतात का, अशी विचारणा सरकार आणि एनआयएकडे केली.वेर्नोन गोन्साल्वीस आणि आनंद तेलतुंबडे यांचीही उच्च न्यायालयात धाव
कारागृहात वरवरा राव यांच्या सहवासात आल्याने आपलीही कोविडची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज वेर्नोन गोन्साल्वीस व आनंद तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात केला आहे. या अर्जावर २३ जुलै रोजी उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व एनआयएला दिले आहेत. 'कोविडची चाचणी करा. कोरोनाबाधित नसतील तर खूप चांगले आहे,' असे न्यायलायने म्हटले. दरम्यान, सुधा भारद्वाज यांनीही प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागितला आहे. त्यांच्याही जामीन अर्जावर २३ जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा
Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा
दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या