मुंबई/औरंगाबाद : नव्या कृषी कायद्यांविरोधातील देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्धार अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध शेतकरी संघटनांनी केला आहे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी आज एल्गार पुकारणार आहेत.
महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांचे कार्यकर्ते सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल.
काँग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलनकेंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्यांविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहोचला असून मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
साहित्यिकांचा पाठिंबाकृषी कायद्यासह इतर अनेक मागण्यांसाठी दिल्ली येथे एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, हे आपले कर्तव्यच आहे, अशी भूमिका काही प्रसिद्ध साहित्यिकांनी घेतली आहे.