महाराष्ट्र दिनी 'अभिजात मराठी'साठी एल्गार; मराठी भाषा संस्था करणार आंदोलन
By मनोहर कुंभेजकर | Published: April 17, 2023 08:24 PM2023-04-17T20:24:51+5:302023-04-17T20:25:02+5:30
साहित्यिक- कलावंत, पत्रकार, मराठी भाषा संस्था करणार आंदोलन
मुंबई - मराठी भाषेला ‘अभिजात' दर्जा देण्यात यावा, यासाठी २०१४ पासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठीच्या अभिजाततेचे सर्व दस्तावेज सादर करूनही विलंब होत असल्याने मराठी भाषाप्रेमींध्ये तीव्र नाराजी आहे. येत्या महाराष्ट्र दिनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी करत साहित्यिक- कलावंत, पत्रकार तसेच मराठी भाषेसाठी काम करणार्या संस्था रस्त्यावर उतरणार आहेत. काळ्या फिती लावून या दिरंगाईचा निषेध करणार आहेत.
अभिजात मराठी भाषा आणि बोली भाषा संवर्धन समितीच्यावतीने केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना काल पत्र लिहिण्यात आले. गेली नऊ वर्षे १२ कोटी मराठी भाषक जनता अभिजात दर्जा मान्यतेची वाट पाहत आहे. या दीर्घकालीन विलंबाचा आणि दिरंगाईचा या पत्रातून निषेध करण्यात आला आहे. दि, १ मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि,३० एप्रिल या तारखेपर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, ही विनंती पत्रातून करण्यात आली आहे. तसे झाले नाही तर महाराष्ट्र दिनी मराठी साहित्यिक- कलावंत- पत्रकार आणि सामान्य जनता काळ्या फिती लावून या दिरंगाईचा निषेध ठळकपणे सार्वजनिकरित्या करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यभरातून एल्गार
लेखक, नाटककार प्रेमानंद गज्वी, कवी डॉ. महेश केळुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठीप्रेमी एकवटणार आहेत. अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि लक्ष्मीकांत देशमुख, लेखक —प्रकाशक रामदास भटकळ, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र शोभणे, छत्तीसगड मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कपूर वासनिक, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान सिंधुुदुर्गचे वामन पंडित, मराठी संशोधन मंडळ डॉ. प्रदीप कर्णिक, सार्वजनिक वाचनालय कल्याणचे अध्यक्ष भिकू बारस्कर, मराठी आठव दिवसचे संस्थापक रजनीश राणे, झाडी बोली साहित्य मंडळाचे संस्थापक डॉ. हरिश्चंद्र बोरकर या संस्थासह अनेक साहित्यिक- भाषाप्रेमी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.