मराठा मूक मोर्चाचा एल्गार, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 01:01 PM2017-08-09T13:01:48+5:302017-08-09T13:09:27+5:30
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आज मराठा समाजाचा ऐतिहासिक असा मूकमोर्चा मुंबईत धडकला. अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे. आज निघाल्या भगव्या वादळापुढे सरकार नरमले आहे .
मुंबई,. दि. 9 : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आज मराठा समाजाचा ऐतिहासिक असा मूकमोर्चा मुंबईत धडकला. अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे. आज निघाल्या भगव्या वादळापुढे सरकार नरमले आहे . तब्बल 57 मोर्चे काढून सुधा मराठा समाजाच्या मागणीकडे रीतसर दुर्लक्ष केल्याने आता या भगव्या वादळाचा मूक हुंकार राजधानीत गुंजत आहे. या मराठा मूक आक्रोशासमोर सरकर नरमले आहे आणि ४ निर्णय तातडीने घेण्यात आले आहेत.
यामध्ये मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार समितीला कॅबिनेट दर्जा देणार, समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही. हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, राज्य मागास आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या EBC मार्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्के करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणार.
आज सकाळी मुंबईत मराठा समाजाच्या मूक मोर्चाचा एल्गार निघाला. भायखळा येथील राणीबागेहून मोर्चाला सुरुवात झाली, पुढे हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.