Elgar Morcha : सरकारने घोटला लोकशाहीचा गळा, एल्गार मोर्चा निघणारच! - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:25 AM2018-03-26T06:25:05+5:302018-03-26T06:25:05+5:30

मुंबईतील एल्गार मोर्चाला परवानगी नाकारून सरकारने लोकशाहीचा गळा घोटला असून, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारण्याचे काम सरकारकडून होत आहे.

Elgar Morcha: Government will get a demoralized Jhalak Dal, Elgar Morcha will leave! - Prakash Ambedkar | Elgar Morcha : सरकारने घोटला लोकशाहीचा गळा, एल्गार मोर्चा निघणारच! - प्रकाश आंबेडकर

Elgar Morcha : सरकारने घोटला लोकशाहीचा गळा, एल्गार मोर्चा निघणारच! - प्रकाश आंबेडकर

Next

मुंबई : मुंबईतील एल्गार मोर्चाला परवानगी नाकारून सरकारने लोकशाहीचा गळा घोटला असून, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारण्याचे काम सरकारकडून होत आहे. पोलिसांच्या आडून सरकारच ‘गोळी’ चालवत आहे. एल्गार मोर्चासाठी महाराष्ट्रातून नागरिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते आता परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सोमवारचा एल्गार मोर्चा निघणारच, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मांडली.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी, सोमवारी जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी ऐन वेळी मोर्चाला परवानगी नाकारली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी पोलीस आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली. परवानगी नाकारायचीच होती, तर ती आधीच नाकारायची होती. आता मोर्चासाठी राज्यातून लोक निघाले आहेत. त्यांना परत पाठविता येणार नाही. जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात करायचे आमचे नियोजन होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारून ते विस्कटवले. आता आम्ही थेट सीएसएमटीला जमणार आणि तिथेच काय तो निर्णय घेणार. आता नियंत्रण करणे आमच्या हातात नाही. सोमवारी जे काही होईल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. सरकारने अजूनही आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मिलिंद एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडे यांनाही अटक होईल, अशी अपेक्षा होती, परंतु सरकारकडून कोणतीच हालचाल नाही. ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी घातली जात आहे, तर मारणारे मोकाट फिरत आहेत, अशी टीकाही प्रकारश आंबेडकरांनी केली.
‘मला कोणतेही मंत्रिपद कधीच नको होते. त्यामुळे माझ्याबाबत कुणाला राजकीय भीती बाळगण्याचे कारण नाही. या सरकारने आणि आधीच्या सरकारनेही मला मंत्रिपदाची आॅफर दिली होती,’ असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.

संभाजी ब्रिगेडचा मोर्चाला पाठिंबा
संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणाऱ्या एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात ब्रिगेड आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी उतरणार असल्याचे, ब्रिगेडचे पुणे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 

Web Title: Elgar Morcha: Government will get a demoralized Jhalak Dal, Elgar Morcha will leave! - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.