Join us

Elgar Morcha : मोदीच आमचं टार्गेट, आंदोलन सुरूच राहणार; प्रकाश आंबेडकरांचा 'एल्गार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 11:24 AM

संभाजी भिडेंना अटक न होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच हात असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबईः कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांच्याविरोधात पुरावे नाहीत असं सरकारचं म्हणणं असेल तर एफआयआरमध्ये त्यांचं नाव का घेतलंय? मुळात, भिडे गुरुजी दोषी आहेत की नाही, हे न्यायालयाला ठरवू द्या. तुम्ही त्यांना कोर्टात हजर करण्याऐवजी जावयासारखी वागणूक का देताय?, असा थेट सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला. संभाजी भिडेंना

अटक न होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढच्या काळातही मोदीच आमचं लक्ष्य राहतील आणि त्यांच्याविरोधात आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

आजच्या आंदोलनाचं स्वरूप काय असेल, कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार का आणि 'महाराष्ट्र बंद'सारखंच आंदोलन चिघळणार का, अशी धाकधुक मुंबईकरांच्या मनात आहे. परंतु, आजच्या आंदोलनाची दिशा सर्व सहभागी संघटना आल्यानंतरच निश्चित होईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. 

भिडे गुरुजींच्या अटकेच्या मागणीसाठी एल्गार परिषदेचे कार्यकर्ते आज आझाद मैदानात एकत्र जमलेत. जिजामाता उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत ते मोर्चा काढणार होते. पण, सरकारने या मोर्चाला परवानगी नाकारली आणि केवळ आंदोलन करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आज सकाळपासून आझाद मैदानावर कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. त्यांना भेटण्यासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर आझाद मैदानावर आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 

>> 'महाराष्ट्र बंद'च्या वेळी तीन वाजेपर्यंत शांतता होती, मग ती अचानक भंग कशी झाली?, याची न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. 

>> आमच्या कार्यकर्त्यांना दंगेखोर म्हणून बदनाम केलं जातंय, पण सनातन हिंदूंनीच मारहाणीचे प्रकार केले होते.

>> एल्गार परिषदेतील सर्व सहभागी संघटना एकत्र आल्यावर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.  

>> भाजपानं फक्त मोर्चावर बंदी घातली, आंदोलनावर नाही. हे राजकारणच आहे आणि आम्ही बळी ठरतोय.

>> संभाजी भिडे हे राजकीय जावई का आहेत, हे कळायला हवं. त्यांना कोर्टापुढे हजर करा.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपामुळेच भिडेंना अटक झालेली नाही. नरेंद्र मोदीच यापुढेही आमचं लक्ष्य असतील. 

टॅग्स :संभाजी भिडे गुरुजीप्रकाश आंबेडकरनरेंद्र मोदी