मुंबई : कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याविरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सोमवारपासून आझाद मैदान येथे तीनदिवसीय राज्यव्यापी आंदोलन सुरू केले. सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
परिचारिका संघटनेची शाखा सर ज. जी. समूह रुग्णालयात परिचारिकांनी एक तास काम बंद आंदोलन करीत निदर्शने केली. परिचारिका एकजुटीचा विजय असो, खासगीकरण बंद करा, अशा घोषणा परिचारिकांनी दिल्या आणि खासगीकरणाला तीव्र विरोध दर्शविला. शासनाने चर्चेसाठी बोलावले नाही तर २८ मे २०२२ पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र परिचारिका संघटनेने सरकारला दिला आहे.
परिचारिकांनी वारंवार सरकारकडे मागण्या मांडल्या; मात्र त्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले. - मनीषा शिंदे,राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना
परिचारिकांच्या प्रमुख मागण्या वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांच्या पदांचे कंत्राटीकरण न करता, कायमस्वरुपी पदभरती करावी. राज्यातील विद्यार्थी परिचारिकांच्या विद्यावेतनात वाढ करावी. केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे, गणवेश भत्त्यात वाढ करण्यात यावी. केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे नर्सिंग भत्ता लागू करावा. सरसकट नियमितपणे ७२०० रुपये प्रतिमहिना भत्ता नव्याने मंजूर करावा. इतर भत्ते सुद्धा केंद्र सरकारप्रमाणे लागू करावे.