Join us

एल्गार परिषद प्रकरण: आरोपींच्या कोविड अहवालात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 4:46 AM

सरकारला स्पष्टीकरण देण्याचे कोर्टाचे निर्देश

मुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमा प्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे व महेश राऊत यांच्या कोविड-१९ च्या अहवालात आरोपींची नमूद केलेली उंची, वजन व अन्य बाबींमध्ये साम्य आढळल्याने स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही आरोपींचे कोविड-१९ चे अहवाल ३ आॅगस्ट रोजी सादर करून ५ आॅगस्टला सार्वजनिक करण्यात आले. राऊत यांचे वकील विजय हिरेमठ यांनी न्यायालयाला सांगितले की, राऊत यांच्या कोविड-१९ च्या (कोरोना) अहवालावरून त्यांना कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट होत असले तरी सहआरोपी तेलतुंबडे यांच्या अहवालात जे नमूद आहे, तेच राऊत यांच्या अहवालात म्हटले आहे. तेलतुंबडेंच्या अहवालात म्हटले आहे की, त्यांच्या शरीरात अँटिबॉडीज विकसित झाली आहेत, याचाच अर्थ तेलतुंबडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.न्यायालयाने हे अहवाल स्वीकारू नयेत. राऊत यांच्या अहवालाबाबत शंका आहे. दोन व्यक्तींची उंची, वजन, रक्तदाब, नाडी, आॅक्सिजनची पातळी सारखीच कशी असू शकते? राऊत यांचाच तो अहवाल आहे का, याबाबत शंका आहे, असे हिरेमठ यांनी म्हटले.उच्च न्यायालयानेही अहवालाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर तळोजा कारागृह प्रशासनाकडून सूचना घेऊन पुन्हा तपासणी करू, असे सरकारी वकील वाय.पी. याग्निक यांनी सांगितले.