अभियंत्रिकी प्रवेशांसाठी प्रवेश पात्रता व नियमांत होणार बदल - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:37 AM2020-07-03T01:37:27+5:302020-07-03T01:37:39+5:30
अभियांत्रिकीप्रमाणेच आयटीआय (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय) प्रवेशाची प्रक्रिया ही यंदा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी व इतर तांत्रिक व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पात्रता व नियम यांमध्ये लवकरच बदल करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे बदल करण्यात येणार आहेत. शिवाय राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना राज्यातच शिक्षण घेण्याची संधी यांमुळे उपलब्ध होऊ शकेल याचा प्रयत्न उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून केला जाणार आहे. याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिलीे. त्यामुळे पुढच्या काही आठवड्यांत या संबंधातील प्रस्ताव अपेक्षित असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळाली आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीच्या निकालाला लेटमार्क लागला आहेच.मात्र, सीईटीची परीक्षा ही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला ही लेटमार्क भरून काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया अधिकाधिक सोयीची व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेत बदल शासन स्तरावर प्रस्तावित असतील आणि लवकरच ते संचालनालय निर्देशित केले जाणार असतील त्यामुळेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती ट्विट करून दिली जात असल्याचे कळते.यंदा सर्वच अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीनेच करण्याची आवश्यकता असल्याने प्रवेश प्रक्रियेच्या नियमांना बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभियांत्रिकीप्रमाणेच आयटीआय (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय) प्रवेशाची प्रक्रिया ही यंदा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
आयटीआय विद्यार्थ्यांसाठीही सोय
दरवर्षी दहावीच्या निकालानंतर हे प्रवेश केंद्रीय आॅनलाईन पद्धतीनेच होत असले तरी यंदा प्रमाणपत्रे पडताळणी तसेच कागदपत्रे यासाठीही आॅनलाईन सॉफ्टवेअरची प्रणाली तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या दहावीच्या प्रमाणपत्र व निकालावरूनच त्याच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची पडताळणी त्यात करता येणार आहे. त्यामुळे यंदा आयटीआय विद्यार्थ्यांचाही आॅनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश होणार आहेत.