Join us

राज्यातील नाविक कामगारांची ‘लसचिंता’ दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:06 AM

‘मास्सा’ करणार मोफत लसीकरण; रोजगारावरील संकट टळलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरात निर्माण झालेल्या लस तुटवड्याचा सर्वाधिक ...

‘मास्सा’ करणार मोफत लसीकरण; रोजगारावरील संकट टळले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशभरात निर्माण झालेल्या लस तुटवड्याचा सर्वाधिक फटका नाविक कामगारांना बसत आहे. लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कामावर रुजू करून घेतले जात नसल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘मास्सा’ने राज्यातील नाविक कामगारांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे.

नाविक कामगारांना जहाजासोबत विविध देशांत भ्रमंती करावी लागते. त्यामुळे नौवहन क्षेत्रातील देश-विदेशातील कामगार त्यांच्या थेट संपर्कात येतात. भारतातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि या विषाणूच्या स्वरूपात झालेल्या बदलांची धास्ती घेत परदेशातील बहुतांश बंदरांनी भारतीय नाविकांना मज्जाव केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला असल्याने लसीकरणापासून वंचित असलेल्या नाविक कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार निर्माण झाली. त्यामुळे ते चिंतेत होते.

ही बाब लक्षात घेऊन नौवहन क्षेत्रातील आघाडीची संस्था ‘मास्सा’ने या कामगारांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येत्या १० जूनपासून राज्यातील १० हजार नाविक कर्मचाऱ्यांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे, असे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिव हळबे यांनी सांगितले.

भारतात दिल्या जाणाऱ्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींपैकी कोव्हॅक्सिनचा समावेश अद्याप जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत न झाल्याने पुढील अडथळे टाळण्यासाठी या सर्व कामगारांना कोविशिल्ड लस देण्यात येईल. ८४ दिवसांच्या कालावधीनंतर दुसरा डोसही मोफत दिला जाईल, असेही सांगण्यात आले.

* नौवहन मंत्र्यांनी केले कौतुक

केंद्रीय बंदरे आणि नौवहन मंत्री मनसुख मांडवीय यांनी ‘मास्सा’च्या या निर्णयाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील नाविक कामगारांना याचा मोठा फायदा होईल. जागतिक नौवहन क्षेत्रातील भारताचा वाटा वाढविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

* कालावधी कमी करण्याची मागणी

- लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय जहाजावर रुजू करून घेतले जात नाही. मात्र, देशात लसींचा तुटवडा आहे. भारतात दोन डोसमधील कालावधी ८४ दिवसांपर्यंत वाढविण्यात आल्याने इतके दिवस नोकरीवाचून खायचे काय, असा सवाल नाविकांनी उपस्थित केला. नौवहन क्षेत्रातील कामगारांसाठी हा कालावधी कमी करावा, अशी मागणी देशातील २ लाखांहून अधिक नाविक कामगारांकडून केली जात आहे.

..........................................................