दादर मासळी मार्केटमधील कोळी महिलांवर झालेला अन्याय दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:09 AM2021-08-19T04:09:02+5:302021-08-19T04:09:02+5:30

मुंबई : दादर पश्चिम तुलसी पाईप रोड येथील कै. मीनाताईं ठाकरे मासळी बाजारमधील मासे विक्रेत्या कोळी महिलांनी महानगरपालिका ...

Eliminate the injustice done to women fishermen in Dadar fish market | दादर मासळी मार्केटमधील कोळी महिलांवर झालेला अन्याय दूर करा

दादर मासळी मार्केटमधील कोळी महिलांवर झालेला अन्याय दूर करा

Next

मुंबई : दादर पश्चिम तुलसी पाईप रोड येथील कै. मीनाताईं ठाकरे मासळी बाजारमधील मासे विक्रेत्या कोळी महिलांनी महानगरपालिका प्रशासनाचा एकजुटीने विरोध केला आहे. अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या समस्या यावेळी ‘लोकमत’ला कथन केल्या. निव्वळ मासळीचा वास येतो व दुर्गंधी पसरून सांडपाणी जमा होते म्हणून पालिका प्रशासनाने येथील मासळी मार्केटवर हातोडा मारला, असा एल्गार येथील कोळी महिलांनी केला.

लवकरात लवकर दादर मासळी मार्केटमधील कोळी महिलांवर झालेला अन्याय दूर करीत, त्या महिलांना जुन्या बाजार परिसरातच मासळी विक्रीकरिता बसण्याची सोय महानगरपालिकेने करून द्यावी, अशी मागणी अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघटनेने केली आहे.

मुंबईचे मूळ रहिवासी हे कोळी बांधव असूनदेखील त्यांच्याच भूमीत त्यांना त्यांचा मासेविक्रीचा पारंपरिक व्यवसाय करण्यास महानगरपालिका मोठा अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार दादर मासळी मार्केटमधील कोळी महिला कांचन तापोरी व इतर ज्येष्ठ कोळी महिलांनी केली.

सदर महिलांना मासे विक्रीकरिता रीतसर महानगरपालिकेकडून ३७ परवाने ओळखपत्र प्राप्त असूनदेखील सदर मासळी मार्केट उद्ध्वस्त केल्याकारणाने कोळी महिलांचे खूप हाल होत आहेत; शिवाय उन्हापावसात बसल्यामुळे मासळीदेखील सडत जाते व लाखोंचा माल वाया जातो, असे त्या महिला दुःखद अंतःकरणाने सांगत होत्या.

पालिकेने गोव्याचे मच्छीमार्केट बघून यावे. आपली जबाबदारी झटकून फक्त कोळी समाजाला उद्ध्वस्त करण्याचा पालिकेचा आणि सत्ताधाऱ्यांचा डाव असून राज्यकर्त्यांच्या व्होटबँक सांभाळण्याचे काम मात्र चोखपणे बजावत आहे, असा आरोप कोळी महिलांनी केला.

Web Title: Eliminate the injustice done to women fishermen in Dadar fish market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.