Join us  

दिंडोशीतील वाहतूक कोंडीवर अडथळा ठरणारे बॉटलनेक दूर करा; शिवसेनेची पालिका प्रशासनाकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: April 28, 2023 6:08 PM

दिंडोशीतील मालाड (पूर्व ) आप्पा पाड्यात लागलेल्या भीषण आगीच्या ठिकाणी वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे अग्निशमन दलाची वाहने तसेच रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर झाला.

मुंबई - दिंडोशीतील मालाड (पूर्व ) आप्पा पाड्यात लागलेल्या भीषण आगीच्या ठिकाणी वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे अग्निशमन दलाची वाहने तसेच रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर झाला. परिणामी आगीचा भडका वाढला व मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. दिंडोशी विधानसभा ) क्षेत्रातील जास्तीत जास्त भाग हे झोपडपट्टीने आच्छादलेले असून बारीक व चिंचोळ्या रस्त्यांमुळे वाहनधारकांनाच नाही तर पादचाऱ्यांना देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणजे दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील वाहतुकीस अडथळा ठरणारे बॉटल नेक काढून रस्ते वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुले करणे आवश्यक आहे.

 याबाबतचा संपूर्ण आढावा शिवसेना विधी मंडळ मुख्य प्रतोद (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका प्रशासनासोबत झालेल्या आढावा बैठकीत घेतला.

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील रखडलेली विविध नागरिकामे कामे, उद्यानांची कामे, रस्ते रुंदीकरण, नालेसफाई कामांचा आमदार सुनील प्रभू यांनी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका प्रशासनासोबत आढावा बैठक मालाड पश्चिम  पी उत्तर विभाग कार्यालयात येथे संपन्न झाली. 

पायाभूत सुविधांचा विकास करत असताना मुख्यत्वे रस्त्यांमधील बॉटल नेक काढून रस्ते पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करण्याची मागणी आपण मागील अनेक वर्षांपासून सतत सातत्याने करत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.वाहतूक कोंडीवर उपाय योजना म्हणून रस्ते खड्डे मुक्त करून समतोल करणे आवश्यक असून जेणेकरून वाहतूकीचा वेग वाढेल तसेच पावसाळयानंतर दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील मंजूर रस्ते सिमेंट काँक्रीट करण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे करण्यात आले असून अनेक कामे सुरु आहेत. त्या कामांची सद्य स्थिती जाणून घेतली व रस्ते खड्डे मुक्त करण्याच्या सूचना महापालिका पदाधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या सूचना देखील महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. उद्यानांची सुरू असलेली कामे लवकरात लवकर संपवून उद्याने नागरिकांकरिता खुले करण्याची विनंती आमदार सुनील प्रभु यांनी यावेळी केली. पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सर्व कामे समाधानकारकरित्या तसेच नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार सुनील प्रभू व शिवसेना पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले.

या बैठकीला माजी उपमहापौर अँड.सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, विधानसभा संघटक विष्णू सावंत, रीना सुर्वे, पूजा चौहान, उपविभाग प्रमुख सुनील गुजर, गणपत वारीसे, महापालिका सहाय्यक अभियंता परिरक्षण जमादार, सहाय्यक अभियंता पर्जन्य जलवाहिन्या अमोल दलाल, सहाय्यक अभियंता रस्ते इंगोले, सहाय्यक उद्यान अधीक्षक योगेंद्रसिंग कच्छावा यांच्यासह इतर महापालिका अधिकारी व शिवसेनेचे शाखाप्रमुख उपस्थित होते.

 

टॅग्स :मुंबईशिवसेना