उच्चभ्रू वसाहतीत घरफोड्या करणाऱ्या वृद्धाला बेड्या
By admin | Published: March 9, 2017 01:48 AM2017-03-09T01:48:59+5:302017-03-09T05:02:43+5:30
चोरांपासून सावध राहण्यासाठी घर बंद ठेवा, इमारतीत सीसीटीव्ही बसवा तसेच सुरक्षारक्षकाला ठेवा अशा सूचना मुंबई पोलिसांकडून नागरिकांना देण्यात येतात.
- मनीषा म्हात्रे, मुंबई
चोरांपासून सावध राहण्यासाठी घर बंद ठेवा, इमारतीत सीसीटीव्ही बसवा तसेच सुरक्षारक्षकाला ठेवा अशा सूचना मुंबई पोलिसांकडून नागरिकांना देण्यात येतात. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना नोटिसाही बजाविण्यात आल्या. मात्र घराच्या सुरक्षेसाठी ठेवलेला वृद्ध सुरक्षारक्षकच घरफोड्या करत असल्याची धक्कादायक बाब सायन पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले. गौरीशंकर सुखदेव चौरसिया (६१) असे अटक आरोपीचे नाव आहे. ओशिवारा परिसरात एका इमारतीत घरफोडीचा डाव सुरू असतानाच सायन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
सायन परिसरातील जनता मार्केट इमारतीत १ फेब्रुवारी रोजी गौरीशंकर चौरसिया हा सुरक्षारक्षक म्हणून कामावर रुजू झाला होता. ९ फेब्रुवारी येथील एका घरातून ९६ हजार रुपयांची चोरी झाल्याची माहिती रहिवाशांना मिळाली. त्यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानुसार सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मृदुला लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांच्या तपास पथकाने शोध सुरू केला. या वेळी पोलीस अंमलदार राजेश सावंत, धनराज पाटील, महेश पाटील आणि पंकज सोनावणे त्यांच्या पथकात
होते.
इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज गायकवाड यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यात सुरक्षारक्षकच असलेला चौरसिया असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय घटनेच्या दिवसांपासून चौरसिया गायब झाला होता.
गायकवाड यांच्या पथकाने अन्य ठिकाणी पोलीस ठाण्यात चौकशी केली. तेव्हा चौरसियाला यापूर्वीही अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मुंबईसह त्याच्या गावच्या ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला; मात्र त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. अशात ओशिवारा परिसरातील एका इमारतीत तो सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. मात्र तेथे त्याचा राहण्याचा ठिकाणा नसून रात्रीचा पार्किंग रिक्षामध्ये झोपत असल्याचे समजले. त्यानुसार ओशिवरा येथील घरफोडीचा डाव उधळून लावत तपास पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेश येथील मुहा गावात चौरसिया हा पत्नी दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय यांच्यासोबत राहतो.
घरखर्च भागविण्यासाठी त्याने अनोखी शक्कल लढवली. सुरुवातीला मुंबईच्या विविध सोसायटी, वसाहती, दुकाने यांची रेकी करायची. जेथे सुरक्षारक्षक ठेवताना चौकशीचा ससेमिरा कमी असेल अशी ठिकाणे तो गाठत होता. त्यात वद्धापपणाचा फायदा घेत त्यांच्याकडे नोकरी मागायची.
नोकरी मिळताच सुरुवातीचे ४ ते ८ दिवस काम करून तेथील माहिती मिळवायची. संधी मिळताच मुलाला तेथे बोलावून घेत असे आणि मुलगा घर साफ करेपर्यंत हा बाहेर पहारा देत असे आणि दोघेही लाखोंचा ऐवज घेऊन पसार होत असल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले.
यापूर्वीही अटक...
चौरसियाला कांदिवली, ओशिवारा, बोरीवली पोलिसांनी अशाच प्रकारे घरफोडी केल्याप्रकरणी अटक केली होती. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई परिसरातही त्याने घरफोड्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली.
सुरक्षारक्षक ठेवताना सावधान...
सुरक्षारक्षक ठेवत असताना त्याची माहिती घेणे गरजेचे आहे. स्थानिक पोलीस ठाण्याला त्याची माहिती कळवा. सुरक्षारक्षकाविषयी खातरजमा होताच त्याला नोकरीवर ठेवण्याचे आवाहन सायन पोलिसांनी केले आहे.