Join us  

‘घाना’ला शांत झोप लागावी म्हणून स्वत: घातली ‘एलिझाबेथ कॉलर’; प्राणीप्रेमी आनंद शिंदेंची युक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 6:27 AM

प्राणीप्रेमी आनंद शिंदे यांच्या अनोख्या युक्तीची कमाल

मुंबई : आपल्या लाडक्या कुत्र्याचे काही दुखत-खुपत असेल तर मालकाच्या जीवाची कालवाकालव होते. कुत्र्याला तातडीने डॉक्टरांकडे नेले जाते. योग्य ते उपचार केले जातात. उपचारानंतर योग्य ती काळजीही घेतली जाते. मात्र, आजारी कुत्र्याला शांत झोप लागावी म्हणून त्याच्यासारखीच एलिझाबेथ कॉलर घालण्याची शक्कल विरळीच. मुलुंड येथील प्राणीप्रेमी आनंद शिंदे यांनी ही युक्ती लढवली आहे. 

हत्तींच्या संवर्धनासाठी तसेच त्यांच्या रक्षणासाठी काम करणारे अशी आनंद शिंदे यांची ओळख आहे. त्यांची संस्थाही या क्षेत्रात कार्यरत आहे. शिंदे यांच्या घाना नावाच्या श्वानावर नुकतीच काही वैद्यकीय कारणांमुळे शस्त्रक्रिया करावी लागली. घानावर केलेली शस्त्रक्रिया सुरक्षित राहावी, त्याने शस्त्रक्रिया झाल्याच्या ठिकाणी जीभ लावू नये, यासाठी त्याच्या गळ्याभोवती एलिझाबेथ कॉलर लावण्यात आली. मात्र, त्या कॉलरमुळे घानाला असुरक्षित वाटू लागले. दोन दिवस तो झोपूच शकला नाही. अखेरीस शिंदे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी एलिझाबेथ कॉलर आणून स्वत:च्या गळ्यात बांधली. आपल्या मालकानेही कॉलर घातल्याचे पाहून घाना सुखावला. त्यानंतर त्याला शांत झोप लागली. 

माझ्या घरी ओवी आणि घाना असे दोन श्वान आहेत. दोन आठवड्यांपूर्वी घानावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्याला एलिझाबेथ कॉलर घालण्यास सांगतिले होते. मात्र, ही कॉलर घातल्यानंतर घाना दोन दिवस झोपलाच नाही. मग यावर शक्कल म्हणून तिसऱ्या दिवशी तशीच कॉलर मी पण घातली. हे पाहून त्याला बरे वाटले आणि अखेर तो तिसऱ्या दिवशी झोपला. सहा दिवस मी ही कॉलर घालूनच झोपत होतो. आता मात्र त्याची कॉलर काढण्यात आली आहे. मुक्या प्राण्यांना बोलता येत नसले तरी त्यांच्या भावना आपल्यासारख्याच असतात.      - आनंद शिंदे, प्राणीप्रेमी