एल्फिन्स्टन दुर्घटनेला वर्ष पूर्ण, पण पुलांबाबतच्या समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 06:42 AM2018-09-30T06:42:35+5:302018-09-30T06:43:07+5:30

गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत २३ मुंबईकरांना प्राण गमवावे लागले होते, तर ४० जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त

The Elphinston accident is complete year, but there is a problem with bridge | एल्फिन्स्टन दुर्घटनेला वर्ष पूर्ण, पण पुलांबाबतच्या समस्या कायम

एल्फिन्स्टन दुर्घटनेला वर्ष पूर्ण, पण पुलांबाबतच्या समस्या कायम

Next

मुंबई : प्रभादेवी (एल्फिन्स्टन) रेल्वे स्थानक दुर्घटनेतील मृतांना शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व इतरांनी आदरांजली वाहिली. वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांमधील पुलांबाबतच्या समस्या कायम असल्याचेच चित्र आहे.

गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत २३ मुंबईकरांना प्राण गमवावे लागले होते, तर ४० जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसच्या सचिन सावंतसह कार्यकर्त्यांनी मध्यरात्री आदरांजली वाहिली, तर शेवाळे यांनी शनिवारी सकाळी आदरांजली अर्पण केली. या चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का मिळालेली नाही, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील ४० हून अधिक पुलांची डागडुजी करण्याबाबत राज्य शासनाने यासाठी नेमलेल्या विशेष समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, याकडे शेवाळे यांनी लक्ष वेधले. या दुर्घटनेला वर्ष उलटूनही मुंबईतील इतर रेल्वे पुलांबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. २०१४ पासून दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. एवढी मोठी दुर्घटना घडूनही सरकार अजूनही असंवेदनशील व नकारात्मक, उदासीन असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतर नोकरी देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे, हा सरकारच्या असंवेदनशीलतेचा पुरावा असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: The Elphinston accident is complete year, but there is a problem with bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.