मुंबई : अनेक वर्षांच्या मागणीनंतरही परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणा-या पुलाची समस्या सोडवण्यात आली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना नसून सरकार आणि प्रशासनाने केलेली हत्या असल्याची टीका सर्वपक्षीय नेत्यांनी केली. मध्य व पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांसह रेल्वेमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही होऊ लागली आहे.दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीकेली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वेमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्वपक्षीय खासदार-आमदारांची बैठक घेण्याची लेखी मागणी मी गेल्या वर्षी ११ फेब्रुवारीला केली होती. पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे ते म्हणाले.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, या दुर्घटनेला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे मुंबईकर आहेत. ते रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा बुलेट ट्रेनला जास्त महत्त्व देत आहेत, हे दुर्दैवी असून मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. माजिद मेमन म्हणाले की, रेल्वेमंत्र्यांसह रेल्वेचे संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी या दुर्घटनेला जबाबदार असून या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा.दु:ख असेल, तर बुलेट ट्रेन बाजूला ठेवा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आले, तरी दु:ख होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र रेल्वे दुर्घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे दु:ख पंतप्रधानांना आहे का? तसे असेल तर त्यांनी बुलेट ट्रेनचा प्रकल्प बाजूला ठेवावा आणि मुंबई रेल्वेमधील सोयी-सुविधांवर भर द्यावा, असे काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई म्हणाले.रेल्वेमंत्र्यांना राष्ट्रवादीने अडवले!केईएम रुग्णालयात मृतांच्या नातेवाइकांना भेट देण्यास आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाब विचारण्यासाठी अडवले. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या माध्यमांना चुकवत गोयल यांनी दुसºया प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र माजिद मेमन, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर, महिला मुंबई अध्यक्षा चित्रा वाघ आणि कार्यकर्त्यांनी गोयल यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.सरकार नावे बदलण्यात व्यस्त!१ लाख कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा सरकारने लोकल ट्रेनच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे. साडेतीन वर्षांत सरकार केवळ स्थानकांची नावे बदलण्यात व्यग्र आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष नाही. दुर्घटनेची चौैकशी आणि मृतांच्या नातेवाइकांना मदत देऊन प्रश्न सुटणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी बोलून दाखवले.याच उड्डाणपुलासाठी खूप पाठपुरावा केला, मात्र काहीच उपयोग झाला नाही. पुलाची अवस्था पाहून अशी दुर्घटना घडणार असल्याचे मी सातत्याने सांगत होतो. सरकारने ती बुलेट ट्रेन बाजूला ठेवून प्रथम रेल्वे आणि प्रवाशांचे प्राथमिक प्रश्न सोडवण्याची गरज आहे.- बाळा नांदगावकर, मनसेचे नेते
एल्फिन्स्टन-परळ दुर्घटना: प्रशासनाने केलेल्या हत्याच, सर्वपक्षीय टीका, बुलेट ट्रेन नको आधी लोकल सुधारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 6:18 AM