Join us

Elphinstone Stampede : एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या दोन वर्षांनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 03:03 IST

एल्फिन्स्टन रोड (आता प्रभादेवी) येथे चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू आणि ३६ प्रवासी जखमी झाले होते.

मुंबई : एल्फिन्स्टन रोड (आता प्रभादेवी) येथे चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू आणि ३६ प्रवासी जखमी झाले होते. या घटनेला २९ सप्टेंबरला दोन वर्षे पूर्ण झाली. मात्र रेल्वे प्रशासनाने या घटनेतून कोणताही धडा न घेतल्याचे दिसून येते. कारण मध्य आणि पश्चिम मार्गावरील अनेक स्थानके गर्दीची झाली आहेत. रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट यांची संख्या वाढवली; मात्र गर्दीची समस्या कायम राहिली आहे. त्यामुळे प्रवास अजूनही जीवघेणाच असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरात पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट उभारण्याचा सपाटा लावला. मात्र अनावश्यक ठिकाणी पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्टची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीचे विभाजन झाले नाही. रेल्वे प्रशासनाने फक्त पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट यांच्या संख्येत वाढ केली आहे, असे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.मध्य रेल्वे मार्गावरील दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण तर पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली ही गर्दीचे स्थानके आहेत. या स्थानकांवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. मात्र गर्दीचे नियोजन करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या, स्थानकांत ये-जा करण्यासाठी जादा जागा असणे आवश्यक आहे. या प्राथमिक सुविधा रेल्वे प्रशासनाकडून पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे या स्थानकांवर चेंगराचेंगरीची दुर्घटना होण्याची भीती आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह कायमसर्व लोकल डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. मात्र सीसीटीव्हीची योजना अजून पूर्ण झाली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे, असे प्रवाशांनी सांगितले.जोगेश्वरी टर्मिनसचा प्रकल्प रखडल्याने गर्दीची समस्या कायम आहे.कुर्ला स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पूल अनेक कालावधीपासून बंद आहे. प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.माटुंगा स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पूल अरूंद असल्याने प्रवाशांची येथे गर्दी होते.लोअर परळ स्थानकात विरार दिशेकडे दोन सरकते जिने कमी गर्दीच्या ठिकाणी उभारले आहेत.परळ स्थानकात सीएसएमटी दिशेकडे दोन सरकते जिने आणि लिफ्ट खूप जवळ उभारले आहेत. त्यामुळे येथे याचा उपयोग जास्त होत नाही.

टॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबई लोकल