- महेश चेमटे
मुंबई : अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपलेल्या दसरा सणासाठी एल्फिन्स्टन पूलांवर नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ सुरु होती. शुक्रवारी नेहमीप्रमाणे स्थानकावर दोन्ही फलाटावर लोकल आली. इतक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांनी पूलांचा आसरा घेतला. गर्दी वाढत गेली. तितक्यात ‘पूल गिरा, फूल गिरा’ अशी अफवा उडाली अन् दस-याच्या मुहूर्तावरच काळाने (?) घात केला.
थांबला तो संपला याचे प्रात्यक्षिक मुंबईत खऱ्या अर्थाने दिसून येते. थांबणे हे मुंबईकरांच्या रक्तात नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . तथापि २९ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबई थांबली. नव्हे, मुंबईकर चिरडले गेले. रेल्वे स्थानकाच्या अरुंद पूलावर चेंगराचेंगरीमुळे एक...दोन..नव्हे तर ६२ नागरिकांना फटका बसला. यात २३ जणांचा मृत्यू तर ३९ जखमींचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर अधिका-यांच्या भेटी झाल्या. हाय पॉवर समितीची स्थापना झाली. लाखोंच्या मदतीची घोषणा झाली आणि मिळाली. मात्र दस-याची ‘उष:काल’ २३ प्रवाशांसाठी ‘काळरात्रच’ ठरली.
याच गर्दीत आपल्या बहिनीच्या भेटीस निघालेला भाऊ ही गेला अन
नोकरीच्या पहिल्या दिवशी वेळेत हजर राहण्यासाठी घाई करणारा कमावता मुलगा ही हरपला. वडिलांना उतार वयात आधार देणारी लाडकी ताई ही दुरावली अन नातवाला खेळणी आणण्यासाठी निघालेला आजोबा पुन्हा परतलाच नाही. वर्षांनंतर आज ही त्यांच्या घरात 'धुमसतात अजुनि विजल्या चितांचे निखारे…' अशी अवस्था पाहायला मिळते.
आज २९ सप्टेंबर २०१८ मागे वळून पाहताना या दुर्घटनेमुळे आज ही मनात विचारांचे काहूर पेटते. हो पेटतेच. कारण रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात विचारांचे वादळ नेहमीच सुरु असते. आज एल्फिन्स्टन दुर्घटनेची वर्षपूर्ती. आजचा सूर्योदय नवीन आव्हाने घेऊन येईल. पुन्हा राजकीय भेटी गाठी सुरू होतील. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. वर्षभर विस्मृतीत असलेल्या नागरिक पुन्हा एकदा समोर समोर येतील. आणि पुन्हा एकदा उष: काळ होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.