एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : केईएमच्या बाहेर राजकीय स्टंटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 04:15 PM2017-09-30T16:15:59+5:302017-09-30T16:15:59+5:30
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील रेल्वे प्रवाशांना उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना मदत करण्याऐवजी स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी रुग्णालय परिसरात स्टंटबाजी केली.
मुंबई : एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील रेल्वे प्रवाशांना उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना मदत करण्याऐवजी स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी रुग्णालय परिसरात स्टंटबाजी केली. पक्षातील बड्या नेत्यांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करतानाच माध्यम प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली.
या दुर्घटनेतील जखमी तसेच मृत प्रवाशांची माहिती घेण्यासाठी नातेवाइकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयाकडे धाव घेतली होती. मात्र त्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याऐवजी बहुतेक राजकीय कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करण्यात मग्न होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि इतर बडे नेते या ठिकाणी येत असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर या राजकीय कार्यकर्त्यांकडून स्टंटबाजीला सुरुवात झाली.
पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा
प्रयत्न केला. मात्र आधी माध्यमांच्या प्रतिनिधींना बाहेर काढा, अशी मागणी
करत या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. तसेच काही माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की केली.
उद्धव ठाकरे केईएममध्ये आल्यावर शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत कार्यकर्त्यांनीही रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि रुग्णालय कर्मचाºयांनी त्यास विरोध केला असता, कार्यकर्त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली. हाच प्रकार रेल्वेमंत्री पीयूष गोयल आल्यावरही दिसून आला. ठाकरे आणि गोयल यांच्यापाठोपाठ माजी खासदार मिलिंद देवरा, खा. अशोक चव्हाण या नेत्यांच्या प्रवेशावेळीही रुग्णालय कर्मचारी आणि पोलिसांची कार्यकर्त्यांची समजूत काढण्यामध्ये पुरती दमछाक उडाली.
राज ठाकरे भेट देत नाहीत
रुग्णालय परिसरात मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मनसेच्या पदाधिकाºयांसोबत उभे होते.
राज ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारले असता, नांदगावकर म्हणाले की, डॉक्टर आणि पोलीस यांच्या मदतकार्यात व्यत्यय येईल, असे कोणतेही काम राज ठाकरे करत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही दुर्घटनेनंतर रुग्णालयाला भेट दिलेली नाही.
रक्ताची मदत करायची असल्यानेच कार्यकर्त्यांसह मनसे नेते या ठिकाणी आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.