- चेतन ननावरे।मुंबई : शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास वेळी नेहमीप्रमाणे एल्फिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाºया रेल्वेच्या अतिशय अरुंद पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होती. रेल्वे प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतच प्रवासी कामाच्या दिशेने धाव घेत होते. मात्र ही तक्रार अखेरची तक्रार ठरेल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. बाहेर कोसळणारा पाऊस, अरूंद पुलामुळे संथपणे चालणारे लोक, वाढणारी गर्दी, अफवा, चेंगराचेंगरी हे सर्व दुर्दैवी योग जुळून आले व काळाने त्यांच्यावर घाला घातला.दुर्दैवी घटनेच्या वेळी तिथे प्रत्यक्ष असलेल्या विलास पाटील या प्रवाशाने ‘लोकमत’ला हे सारे कसं घडलं? आणि नेमकं काय काय घडलं? याची अंगाचा थरकाप उडवणारी माहिती दिली.नेहमीच्या तुलनेने सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास परळ व एल्फिन्स्टन पादचारी पुलावर जास्तच गर्दी होती. पावसामुळे प्रत्येक जण गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र छत्रीअभावी बहुतेक प्रवासी पुलाचा कोपरा पकडून उभे होते. पुलाखालून स्थानकाकडे धाव घेणाºया आणि फलाटावरून स्थानकाबाहेर पडणाºया प्रवाशांची संख्या वाढू लागली. पावसामुळे बहुतेक प्रवासी पूल सोडण्यास तयार नव्हते. याउलट पावसाच्या माºयापासून वाचण्यासाठी बाहेरील लोक व अनेक प्रवासी पुलावर येण्यासाठी घाई करत होते.सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर बाहेर पडता येत नसल्याने आणि आत शिरणारे प्रवासी एकमेकांना भिडले आणि पुलावर कोंडी झाली. तुलनेने अरूंद असलेल्या दुर्घटनाग्रस्त पुलावरील गर्दी काही करता पुढे सरकत नव्हती. त्यात १५ ते २० मिनिटांत मध्य आणि पश्चिम रेल्वेतून उतरून शेकडो प्रवासी पुलावर पोहचले. तिन्ही बाजूने बंद असलेल्या या जागेमध्ये श्वास कोंडू लागल्याने प्रवाशांचा संयम तुटला आणि गर्दीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले.तिथे उपस्थित असलेल्या एकमेव पोलिसालाही गर्दीतील लोक जुमानत नव्हते. अखेर पत्र्याचा कर्रकर्र असा आवाज झाला आणि या धक्काबुक्कीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. त्यामुळे रोजच दबा धरून बसणाºया काळाने अखेर आज वेळही साधली आणि काळाने २२ निष्पाप जीवांचा बळी घेतला.
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : काय घडलं? कसं घडलं? अफवा आणि प्रशासनही जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 4:28 AM