मुंबई : चेंगराचेंगरीची दुर्घटना झालेल्या एल्फिन्स्टन रोड तसेच करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील नवे पादचारी पूल लष्कर बांधणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एल्फिन्स्टन पुलाची पाहणी केली. त्यानंतर ही त्यांनी घोषणा केली.३१ जानेवारीपूर्वी हे तीनही पूल उभारण्याचे काम लष्कराचा अभियांत्रिकी विभाग करेल. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीला रविवारी एक महिना पूर्ण झाला. या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा बळी गेला. करी रोड, आंबिवलीतील वाढत्या गर्दीमुळे तेथेही नवा पूल बांधण्यात येणार आहे. निविदा मागविण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. लष्कराची यंत्रणा वेळेत काम करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जलद काम होण्यासाठी रेल्वे आणि लष्कराच्या अभियंत्यांनी संयुक्त जबाबदारी घेण्याची मागणी मुंबईचे भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी केली होती. विरोधी पक्षांनी मात्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून, यातून सरकारचे अपयश दिसून येत आहे.३१ जानेवारीला प्रवाशांसाठी खुलाएल्फिन्स्टन पूल बांधण्याचे काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ३१ डिसेंबरला पायाभरणी होईल. ३१ जानेवारीपर्यंत सर्व कामे संपवून पूल प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.शिवसेनेला निमंत्रण नाही : पुलाच्या मुद्द्यावर भाजपा कुरघोडीचे राजकारण करत असल्याची टीका शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी केली आहे. शिवसेनेला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही, असे ते म्हणाले.
एल्फिन्स्टनचा नवा पूल लष्कर बांधणार; तीन महिन्यांत उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 6:42 AM