Join us

...तर एकही शिवशाही धावणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 6:00 AM

खासगी कंपन्यांचा इशारा : दंड आकारण्यावरून कंपन्या आणि एसटी महामंडळ आमनेसामने

-  महेश चेमटे

मुंबई : परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शिवशाहीच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. करारबाह्य दंड आकारण्यात येत असल्यामुळे, शिवशाही सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आणि एसटी महामंडळ आमने-सामने आले आहेत. महामंडळाच्या अधिकाऱयांनी कराराचे पालन न केल्यास एकही खासगी शिवशाही राज्यात धावणार नाही, असा इशारा या कंपन्यांनी महामंडळाला दिला. त्यामुळे ऐन दिवाळीत शिवशाहीने प्रवास करू इच्छिणाऱया प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयात शिवशाही पुरवठादार आणि एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाºयांची नुकतीच बैठक झाली. या मॅरेथॉन बैठकीत अवास्तव दंड आकारू नये, तसेच करारानुसार आगारात प्र्रत्येकी १२ शिवशाही सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अशी भूमिका खासगी कंपन्यांनी मांडली. मात्र, महामंडळातील अधिकाºयांनी यास नकार देत, प्रत्येक विभागाला किमान ७ ते ९ शिवशाही देण्यावर ठाम राहिले.

मागणी पूर्ण न झाल्यास एकही शिवशाही धावणार नसल्याचा इशारा खासगी कंपन्यांनी महामंडळाला दिला. ७ खासगी कंपन्यांकडून महामंडळात खासगी शिवशाही सुरू असल्याची माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर दिली.

महामंडळाच्या ताफ्यात येणाºया एकूण दोन हजार शिवशाहींपैकी सध्या ९७५ शिवशाही राज्यात धावत आहेत. यापैकी ४८० शिवशाही या खासगी कंपन्यांच्या असून, यात ६८ शयनयान आणि ४१२ बैठ्या आसनी गाड्यांचा समावेश आहे, तर महामंडळाच्या मालकीच्या ४९५ शिवशाही प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू आहेत. सद्यस्थितीत एकूण २६० पेक्षा अधिक शिवशाही या अपघातग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे खासगी कंपनीला तब्बल लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

सिंगल रोडवर शिवशाहीची उंची आणि लांबी यामुळे अपघात होत आहेत. वेगावर नियंत्रण ठेवण्यास अपयश येत आल्याने अपुरे चालक प्रशिक्षण अपघातास कारणीभूत ठरत आहे. वारंवार घडणारे अपघात, अस्वच्छ शिवशाही, मार्गादरम्यान ब्रेकडाउन यामुळे संबंधित विभागाकडून संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱयांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले.सध्या शिवशाहीचे साधे पंक्चरचे कामही महामंडळाच्या आगारात होत नाही. ६-७ शिवशाहींसाठी देखभाल-दुरुस्तीची संपूर्ण यंत्रणा उभारणे अव्यवहार्य असल्याचा दावा खासगी कंपन्यांनी केला आहे.

मुख्यालयात दंडाची माहिती नाहीकरारानुसार शिवशाहीवर दंड करण्याची मुभा संबंधित विभागांना देण्यात आली आहे. दंडाची माहिती मुख्यालयात येत नाही. राज्यात एकूण ९७५ शिवशाही धावत असून, सर्व शिवशाहींना चांगला प्रतिसाद लाभत आहे.- एस. पी. जोशी, विभाग नियंत्रक, शिवशाही

अशी ही ‘ढकलाढकली’शिवशाही खासगी पुरवठादार आणि महामंडळ यांच्या बैठकीबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘या बैठकीबाबत वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकाशी संपर्क साधावा.’ वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :मुंबईशिवशाही