अधिकाऱ्यांची नाराजी, मात्र सहकार्यासाठी राजी
By admin | Published: November 11, 2015 02:19 AM2015-11-11T02:19:27+5:302015-11-11T02:19:27+5:30
राज्याचे प्रशासन सरकारला सहकार्य करीत नसल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबद्दल राजपत्रित अधिकारी संघटनेने आज मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना भेटून नाराजी व्यक्त केली
मुंबई : राज्याचे प्रशासन सरकारला सहकार्य करीत नसल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबद्दल राजपत्रित अधिकारी संघटनेने आज मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना भेटून नाराजी व्यक्त केली मात्र, सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याचीच आमची भूमिका असेल, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले.
अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांच्या नेतृत्वातील महासंघाच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात क्षत्रिय यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने संपूर्ण प्रशासन सरकारला असहकार्य करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जे कामचुकार अधिकारी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, पण सर्व प्रशासनाला दोष दिल्यास ते नाऊमेद होईल, अशी भावना कुलथे यांनी मांडली.
क्षत्रिय यांनी यावेळी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रशासनाला दोष दिलेला नाही. काही अधिकारी सहकार्य करीत नसल्याचे म्हटले आहे. अमरावती, नागपूर आणि पुण्यातील एमआयडीसी भूखंड वाटप, जमीन अकृषक करण्याच्या प्रकरणांत दिरंगाई केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सरकारच्या खांद्याला खांदा लावून प्रशासन काम करेल, असे आश्वासन त्यांना दिले आहे, असेही क्षत्रिय यांनी स्पष्ट केले. कुलथे यांनी नंतर मुख्यंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सरकारचा कारभार हाकताना प्रशासनाची साथ मिळेल,
अशी ग्वाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना
दिली. (विशेष प्रतिनिधी)