मंत्रालयात दूषित पाण्याने कर्मचाऱ्यांना जुलाब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:53 AM2019-06-22T04:53:49+5:302019-06-22T04:54:05+5:30
चौकशीचे आदेश; १०० जणांना झाला त्रास
मुंबई : राज्यकारभार जेथून चालतो, त्या मंत्रालयातील पिण्याच्या दूषित पाण्यामुळे शुक्रवारी १०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. या त्रासामुळे एकामागून एक कर्मचारी कार्यालय सोडून जात होते. अनेकजण रजा घेऊन घरी गेले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर दूषित पाण्यामुळे कर्मचाºयांना झालेल्या त्रासाची कबुली सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात महापालिकेचा पाणीपुरवठा होतो. येथील पाण्याच्या टाक्या नुकत्याच क्लोरीन टाकून स्वच्छ केल्या आहेत. प्युरिफायरची तपासणी व दुरूस्ती केली होती. हा प्रकार नेमका कसा घडला याबाबत दोन दिवसांत चौकशीचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.
नमुने तपासण्याचे आदेश
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासा, आरओ यंत्रे व जलवाहिन्या तपासणीची मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले.