Join us

मिठी स्वच्छतेचा खर्च २२ कोटी;आंतरराष्ट्रीय कंपनीची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 2:30 AM

मिठी नदी सर्व्हिस रोड बांधणे ही कामे करावी लागणार आहेत. मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन ३१ मे रोजी संपत असताना मिठी नदी अद्याप गाळात आहे

मुंबई :शहराला मगरमिठीत घेणाऱ्या मिठी नदीच्या विकासाचा मुद्दा १४ वर्षांनंतरही सुटलेला नाही. आतापर्यंत या नदीचे रुंदीकरण, सफाई व स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये पालिका प्रशासनाने खर्च केले आहेत. मात्र कचरा आणि प्लॅस्टिकच्या विळख्यातून आजही मिठी सुटलेली नाही. आता या नदीतील मलमिश्रित पाणी शुद्ध करून नदी स्वच्छ करण्यासाठी एका स्वीडीश कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. पाच वर्षांत मिठी स्वच्छ होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

सन २००५ मध्ये मुंबईला पुराचा तडाखा बसला होता. त्यानंतर तत्काळ मिठी नदीच्या स्वच्छतेचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला. नदी पात्रानजीकचे रहिवासी, औद्योगिक परिसर आणि नाल्यांमधून हजारो दशलक्ष लीटर सांडपाणी नदीच्या पात्रात सोडले जाते. गेली दहा वर्षे नदीचे पात्र रुंद करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर सल्लागाराने सुचविल्याप्रमाणे मलप्रवाह वळवण्यासाठी नदीलगत प्रवाहरोधक बांधणे, मलवाहिन्या टाकणे, मलजल उदंचन केंद्र व मल प्रक्रिया केंद्र उभारणे, मिठी नदी सर्व्हिस रोड बांधणे ही कामे करावी लागणार आहेत.मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन ३१ मे रोजी संपत असताना मिठी नदी अद्याप गाळात आहे. याचा अनुभव मिठी नदीच्या सफाईची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेतील सर्वपक्षीय गटनेते व आयुक्तांनी स्वत: घेतला. पथकाला एका ठरावीक अंतरानंतर पुढे सरकता आले नाही.सल्ल्यांसाठी मोजणार आणखी काही कोटी...चार टप्प्यांच्या कामांचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून आय. व्ही. एल. स्वीडिश एन्व्हायरॉन्मेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला २१.९० कोटी रुपये दिले जाणार आहेत. दुसºया टप्प्यात दोन किमी लांबीचा फिल्टरपाडा ते पवई जल विभाग यार्डापर्यंत, पवई जलविभाग यार्ड ते सीएसटी पूल, कुर्ला, तिसºया टप्प्यात भरतीप्रवण क्षेत्रातील नदीची स्वच्छता, चौथ्या टप्प्यात बापट नाला ते नवीन घाटकोपर केंद्रापर्यंत मलजलबोगद्याचे बांधकाम असे काम होणार आहे.

टॅग्स :नदी