सचिन लुंगसे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जून २०२० पर्यंत २०० हून अधिक आपत्कालीन घटना जगभरात घडल्या असून, २०१९ सालाच्या तुलनेत हे प्रमाण २७ टक्के अधिक आहे. २०२० मध्ये घडलेल्या आपत्कालीन घटनांमध्ये सुमारे ५ लाख ६१ हजार ८८१ कोटींचे नुकसान झाले. यातील ९५ टक्क्यांहून अधिक नुकसान हवामानाशी संबंधित आपत्कालीन घटनांमुळे झाले आहे. मुंबईसह कोकणात धडकलेले ‘निसर्ग’ आणि पश्चिम बंगालमध्ये धडकलेले ‘अम्फान’ हे चक्रीवादळ यात मोडते.२०१९ साली जानेवारी ते जूनदरम्यान १६३ आपत्कालीन घटनांची नोंद झाली होती. २०२० च्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी ते जून दरम्यान जगभरात २०७ आपत्कालीन घटनांची नोंद झाली. यात सर्वाधिक अंदाजे १,१२,३७६ कोटींचे नुकसान अम्फान चक्रीवादळामुळे झाले. हे आर्थिक नुकसान असावे, असा अंदाज बांधला जात असल्याचे ‘ग्लोबल कॅटास्ट्रोफ रिकॅप : फर्स्ट हाफ आॅफ २०२०’ हा अहवाल सांगतो. आपत्कालीन घटनांत २,२०० जणांचा मृत्यू झाला. ६० टक्के मृत्यू पुरामुळे झाले. १,००२ मृत्यू आशिया, प्रशांत क्षेत्रातील आहेत. आफ्रिकेतील मृत्यू जोडले तर आकडा ७१ टक्क्यांच्या आसपास जातो.गेल्या वर्षी पूर आणि चक्रीवादळामुळे २,९०० लोकांचा मृत्यू झाला होता. सर्वाधिक मृत्यू चक्रीवादळामुळे झाले. मुरूडमध्ये निसर्ग चक्रीवादळाने मोठी हानी झाली. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, २०१९ साली जगभरात जेवढे नागरिक विस्थापित झाले; त्यात २० टक्के भारतीय होते. भारतात ५० लाख नागरिक केवळ जागतिक तापमानवाढीमुळे आलेल्या आपत्तीमुळे २०१९ साली विस्थापित झाले.अहवाल आणि अंदाजस्टेट आॅफ इंडियाज एनव्हायर्नमेंट इन फिगर्स २०२० अहवालानुसार, २०१९ साली जगभरात २४.९ कोटी नागरिक विस्थापित झाले. यातील २३.९ कोटी नागरिक हे नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ, समुद्र वादळ आणि वादळामुळे १.१९ कोटी नागरिक विस्थापित झाले.नोव्हेंबर २०१७ साली ओव्हरसिस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट अॅण्ड युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वातावरण बदलीय अहवालानुसार, २०१६ साली २.४ कोटी नागरिक पूर आणि चक्रीवादळामुळे विस्थापित झाले.ओव्हरसिज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार, २०३० सालापर्यंत जगभरात ३२.५ कोटी नागरिकांवर जागतिक तापमानवाढीशी संबंधित आपत्तींचे संकट घोंगावणार आहे.
आपत्कालीन घटनांचा जगाला फटका; मुंबईसह कोकणावर ओढावले ‘निसर्ग’ संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 5:09 AM