मुंबई शहरातील आपत्कालीन व्यवस्था आणखी बळकट होतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:04 AM2019-03-03T02:04:11+5:302019-03-03T02:04:22+5:30
नागरिकांना आपत्तीविषयक प्रशिक्षण प्राप्त व्हावे, जनजागृती व्हावी, आपत्तींकरिता आराखडे तयार केले जावेत, याकरिता महापालिकेने शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राची उभारणी परळ येथील साईबाबा मार्गावर केली आहे.
मुंबई : नागरिकांना आपत्तीविषयक प्रशिक्षण प्राप्त व्हावे, जनजागृती व्हावी, आपत्तींकरिता आराखडे तयार केले जावेत, याकरिता महापालिकेने शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राची उभारणी परळ येथील साईबाबा मार्गावर केली आहे. विद्यार्थ्यांना व आपत्कालीन व्यवस्थापनातील विविध यंत्रणांना संबंधित विषयांतील तज्ज्ञांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जणार आहे.
जागतिक पातळीवर मुंबईचे महत्त्व, आपत्तींमुळे होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी, त्याचे राष्ट्रीय पातळीवर होणारे परिणाम लक्षात घेता, नागरिकांना आपत्तींबाबत विस्तृत माहिती देणारे प्रशिक्षण केंद्र असावे, म्हणून महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत ४ मजली इमारतीमध्ये प्रशिक्षण केंद्र व संशोधन केंद्र म्हणून सुरू करण्यात आले आहे.
तळमजल्यावर विविध आपत्तींची माहिती देणारे कलादालन आहे. यामध्ये डायरोमा, म्युरल्स, चित्रफीत इत्यादींच्या साहाय्याने विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत मांडण्यात आली आहे. पहिल्या माळ्यावर अद्ययावत ग्रंथालय असून, ६० आसनक्षमता असलेला एक वर्ग आहे, तर ३० आसनक्षमता असलेले तीन वर्ग आहेत.
दुसऱ्या माळ्यावर ७० आसन क्षमता असणारे सभागृह असून, त्याच्या शेजारी प्रशिक्षणार्थींच्या खानपानाकरिता भोजनालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या माळ्यावर मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा बॅकअप नियंत्रण कक्ष असून, या कक्षात मुख्यालय नियंत्रण कक्षाप्रमाणेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा बॅकअप नियंत्रण कक्ष ३६५ दिवस सुरू असतो. याचबरोबर, प्रशिक्षण देण्याकरिता मुंबईबाहेरून उपस्थित राहणाºया तज्ज्ञांची राहण्याची व्यवस्था करण्याकरिता ४ अतिथीकक्ष तयार ठेवण्यात आले आहेत. चारमजली प्रशिक्षण केंद्रातील चौथ्या माळ्यावर १५० आसनी सभागृह तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर, या ठिकाणी आपत्तीविषयक माहितीपट दाखविण्याकरिता थ्रीडी सुविधा
आहे.
>२०० जवानांना प्रशिक्षण
एनडीआरएफच्या धर्तीवर मुंबईत घडत असलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी शहर आपत्ती प्रतिसाद पथकाची नव्याने स्थापना केली आहे. यासाठी सुरक्षा दलाच्या २०० जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण दिले आहे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त आय.ए. कुंदन यांनी सांगितले.
>आपत्ती ही सांगून येत नाही. या वेळी स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण शांतपणे विचार करून घटनेचे स्वरूप समजावून घेऊन आपली कृती असणे आवश्यक आहे.
- आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे व्यवस्थापन कसे असावे; यामध्ये नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसोबत नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई
महापालिकेच्या या केंद्रामध्ये लोकसहभाग मिळणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार असल्याचे केंद्रावरून सिद्ध होते.
- निवृत्त लेफ्टनंट मारवाह, सदस्य,
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण