आणीबाणीतील बंदीवानांचे पेन्शन तत्काळ बंद करा, नितीन राऊत यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 02:36 AM2019-12-07T02:36:53+5:302019-12-07T02:37:21+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या मागणीबाबत आपण चर्चा केली आहे.
मुंबई : आणीबाणीतील बंदीवानांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारे पेन्शन तत्काळ बंद करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या मागणीबाबत आपण चर्चा केली आहे. आणीबाणीचा निर्णय हा तत्कालीन केंद्र सरकारने त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन केलेला होता. आणीबाणीविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व काही संघटनांनी केलेले आंदोलन हे राजकीय स्वरुपाचे होते. ते आंदोलन म्हणजे देशासाठीचा लढा कधीही नव्हता. विशिष्ट विचारसरणीतून आणीबाणीला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळच्या आंदोलकांना पेन्शन देणे योग्य नाही. त्या-त्या सरकारविरुद्ध अशी अनेक आंदोलने आजवर झाली मग त्यातील आंदोलकांना पेन्शन दिले होते का, असा सवाल त्यांनी केला. विशिष्ट संघटनांना खूश करण्यासाठी १९७५ नंतर तब्बल ४० वर्षांनी पेन्शन देणे कितपत योग्य आहे, असा सवाल राऊत यांनी केला आहे.