Join us

हेलिकॉप्टरचे समुद्रात इमर्जन्सी ‘लॅंडिंग’; ०४ ठार, ०५ बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 6:20 AM

मुंबई हाय परिसरातील ओएनजीसीच्या ‘सागर किरण’ या तेल-विहिरीपासून एक सागरी मैलावर हा अपघात झाला. 

मुंबई : ओएनजीसी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या  हेलिकॉप्टरला मंगळवारी अरबी समुद्रात इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. हेलिकाॅप्टरच्या तरंगण्याच्या क्षमतेनुसार ते काही मिनिटे पाण्यावर तरंगत राहिले. त्यानंतर मात्र ते समुद्रात बुडाले. यादरम्यान चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र पाच जणांना वाचवण्यात यंत्रणेला यश आले. मुंबई हाय परिसरातील ओएनजीसीच्या ‘सागर किरण’ या तेल-विहिरीपासून एक सागरी मैलावर हा अपघात झाला. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुंबईपासून सुमारे ६० सागरी मैलावर ओएनजीसीचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलटसह एकूण नऊ प्रवासी होते. सागर किरण या तेल विहिरीजवळ हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. यात दोन्ही पायलट आणि तीन ओएनजीसी कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आले. तर, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ओएनजीसी, भारतीय नौदलासह तटरक्षक दलाने मदतकार्य हाती घेतले. या तेल विहिरीवरून रवाना करण्यात आलेल्या लाईफ बोटीने एकाची सुटका केली. तर जवळच गस्तीला असलेल्या ओएनजीसीच्या मालवीय-१६ या बोटीने चार जणांची सुटका केली. तर, भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरने बेशुद्ध अवस्थेतील चौघांना बाहेर काढण्यात यश  आले.

मृत्यू झालेले कर्मचारी --    मुकेश कुमार पटेल (अभियंता), -    विजय मंडलोई (अभियंता),-    सत्यमबाद पत्रा -    संजू फ्रांसिस 

दाेन पायलटसह तिघे वाचले -दोन पायलटसह तिघा कर्मचाऱ्यांना वाचविण्यात बचाव पथकांना यश आले. एम. श्याम सुंदर, प्रदीप वासुदेव, रणजित माल अशी वाचविण्यात आलेल्या ओएनजीसी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.मुंबईपासून ६० सागरी मैलावर ओएनजीसीचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. 

टॅग्स :हेलिकॉप्टर दुर्घटनामृत्यूअपघात