बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 06:00 AM2024-06-03T06:00:02+5:302024-06-03T06:59:42+5:30
आठवड्याभरात विमानात बॉम्बची धमकी देणारी तिसरी घटना आहे.
मुंबई : पॅरिसहून ३०६ जणांना घेऊन मुंबईला येणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी देणारी एअर सिकनेस बॅगवर लिहिलेली चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली. त्यामुळे रविवारी सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अलर्ट जारी करून तपासणी केली असता विमानात काहीही संशयास्पद न सापडल्याने सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आठवड्याभरात विमानात बॉम्बची धमकी देणारी तिसरी घटना आहे.
पॅरिसच्या चार्ल्स डी ग्युले विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या विमानाने उड्डाण केले. प्रवासादरम्यान बॉम्बची धमकी देणारी एअर सिकनेस बॅगवर हाताने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामुळे सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला.
त्यानंतर, १० वाजून १९ मिनिटांनी विमानाचे लँडिंग करण्यात आले. २९४ प्रवासी आणि १२ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर संपूर्ण विमानाची झडती घेण्यात आली. मात्र, संशयास्पद काहीएक आढळले नाही. या घटनेची नोंद करून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
आठवडाभरात तिसरी घटना
विस्ताराने दिलेल्या माहितीनुसार, विस्तारा फ्लाईट यूके ०२४ मध्ये बॉम्बची माहिती मिळताच सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ संबंधित यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला. आठवड्याभरात विमानात बॉम्ब असल्याच्या माहितीची ही तिसरी घटना आहे. शनिवारी चेन्नई ते मुंबईच्या इंडिगो फ्लाईटमध्येही बॉम्ब असल्याचा कॉल आला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.