काेणतीही संकटे येवाेत, आपत्कालीन विभाग सज्ज; अत्याधुनिक यंत्रणेसह दिमतीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:21 AM2024-07-08T11:21:10+5:302024-07-08T11:24:23+5:30

मुंबईला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग ३६५ दिवस २४ तास सतर्क असतो.

Emergency Management Department of the Municipal Corporation is alert 365 days 24 hours to help the citizens | काेणतीही संकटे येवाेत, आपत्कालीन विभाग सज्ज; अत्याधुनिक यंत्रणेसह दिमतीला

काेणतीही संकटे येवाेत, आपत्कालीन विभाग सज्ज; अत्याधुनिक यंत्रणेसह दिमतीला

महेश नार्वेकर 
संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका

अनेक संकटं झेलणारं  मुंबई महानगर २६ जुलै २००५च्या प्रलयंकारी पावसाला कधीच विसरू शकत नाही. त्या वर्षीच्या महापुराने मुंबईसाठी अद्ययावत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची गरज अधोरेखित केली आणि एका लहानशा खोलीतून सुरू झालेला हा विभाग आज अत्याधुनिक यंत्रणेसह दिमतीला सज्ज आहे.    
 
मुंबई हे मर्यादित जमीन  आणि क्लिष्ट भौगोलिक रचनेचं किनारपट्टीवरील महानगर. नैसर्गिक आपत्ती आणि नागरी आव्हानं मुंबईची कायमच परीक्षा घेत असतात. धुवाधार पाऊस आणि चक्रीवादळाचे तडाखे सोसण्याची मुंबईला सवयच आहे. शिवाय, हा भाग भूकंपप्रवण क्षेत्र श्रेणी ३ मध्ये मोडतो. त्यामुळे ६.९ रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंपाचा धोकाही असतोच. भूस्खलनाची ७४ धोकादायक  ठिकाणे आहेत. आग लागण्याच्या, इमारती, घरे, भिंती कोसळण्याच्या घटनाही घडतात. 

मुंबईला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग ३६५ दिवस २४ तास सतर्क असतो. मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधता येतो. त्याचबरोबरच Disaster Management BMC हे मोबाइल ॲप आणि dm.mcgm.gov.in हे संकेतस्थळही मदतीसाठी सज्ज आहे.
 
आपत्कालीन व्यवस्थापन विभाग अग्निशमन दल, पोलिस, वाहतूक पोलिस, रेल्वे प्रशासन, बेस्ट, रुग्णालये, हवामान विभाग, नौदल, भारतीय थलसेना, मंत्रालय यांच्याशी हॉट लाइन्स, आयपी फोन्स इत्यादी सेवांनी जोडलेला आहे. पालिकेच्या मुख्यालयातील या आपत्कालीन यंत्रणेचे  २४ विभागांमध्ये विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. म्हणजे प्रत्येक विभागात छोटा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे.  

१९१६ वर तक्रार आल्यानंतर...

आपत्कालीन घटनेची तक्रार १९१६ या क्रमांकावर आल्यानंतर तिची सत्यता पडताळून ती ‘समादेशन व नियंत्रण प्रणाली’त अंतर्भूत केली जाते. कोणत्या आपत्तीकरिता कोणती प्रतिसाद यंत्रणा कार्यरत करणे आवश्यक आहे, याची माहिती कार्यप्रणालीत आहे. त्यामुळे तक्रार जीआयएस प्रणालीवर मॅप केल्यानंतर तिच्या निरसनासाठी आवश्यक यंत्रणांची यादी संगणकाच्या पडद्यावर प्रकटते. दुर्घटनेच्या स्तरानुसार नियंत्रण कक्षातील कर्मचारी स्वयंचलित पद्धतीने तयार केलेला लघुसंदेश प्रतिसादक यंत्रणांच्या नोडल अधिकाऱ्यांना पाठवतात. प्रत्येक घटनेची आणि त्याला दिलेल्या प्रतिसादाची, जखमी आणि मृतांची माहिती या प्रणालीत नोंदवली जाते.   

पोलिसांनी मुंबईभर लावलेल्या ७०००हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरील थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता या विभागात व्हिडीओ वॉल आहे. पाणी तुंबलेली ठिकाणे, अपघातस्थळे, दुर्घटना ठिकाणे आणि तेथील मदतकार्याचे थेट नियंत्रण व्हिडीओ वॉलवर पाहून संबंधित मदत यंत्रणांशी समन्वय साधला जातो.  

केंद्राचे एनडीआरएफ आणि राज्याच्या एसडीआरएफच्या धर्तीवर मुंबईसाठी सीडीआरएफ स्थापन केले आहे. पालिकेचे  वैद्यकीय अधिकारी / रुग्णसेवक,  अग्निशमन अधिकारी,  सुरक्षारक्षक यांचा त्यात समावेश आहे. त्यांना एनडीआरएफमार्फत प्रशिक्षित करण्यात आले आहे.

Web Title: Emergency Management Department of the Municipal Corporation is alert 365 days 24 hours to help the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई