मुंबई : महामुंबईमेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत मेट्रोचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबई मेट्रो व मुंबई महापालिका यांच्या संयुक्त बैठकांमध्ये मुंबई मेट्रोच्या स्तरावर आपत्कालिन व्यवस्थापनविषयक प्रशिक्षणाची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मेट्रोच्या २ हजार ५०० अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन कक्षाद्वारे करण्यात आले आहे.
आपत्कालिन व्यवस्थापनाची आवश्यकता, आपत्ती म्हणजे काय, धोक्यांची ओळख, धोके म्हणजे काय, जोखीम कशी ओळखावी, जोखीम म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये अगोदर, नंतर काय करावे व काय करू नये, आपत्कालिन व्यवस्थापन चक्र, महापालिकेतील आपत्कालिन व्यवस्थापन विभागाचे कार्य, मेट्रो रेल्वे प्रकल्पात काम करत असताना उद्भवू शकणारे संभाव्य धोके याबाबत चर्चा करून त्याबाबतीत सज्जता, उपशमन, प्रतिबंध कसे करावे व घटना घडलीच तर प्रतिसाद कसा द्यावा? आग म्हणजे काय, आगीचे प्रकार, आग लागू नये म्हणून काय नियोजन करावे, रासायनिक व विद्युत आग लागल्यास काय करावे व काय करू नये, तसेच अग्निशमन प्रणाली आणि अग्निशमके हाताळण्याबाबतची प्रात्यक्षिके, प्रथमोपचार म्हणजे काय, प्रथमोपचाराची मार्गदर्शक तत्वे, जखमांचे प्रकार, लक्षणे आणि उपचार, ट्रॉमा व्यवस्थापन तसेच सी. पी. आर. म्हणजे काय? तो कधी व केव्हा द्यावा, इत्यादीबाबत या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.
आणीबाणीच्या प्रसंगी दोराच्या सहाय्याने सुटका, विविध प्रकारच्या गाठी बांधणे, गाठींचे उपयोग, कोणत्या प्रकारची गाठ कोणत्या आणिबाणीमध्ये सुटका करून घेण्यासाठी उपयोगात येऊ शकते, याची प्रात्यक्षिके, स्ट्रेचर कसे उचलावे, उपलब्ध साधनांपासून सुधारित स्ट्रेचर कसे बनवावे आणि त्याचा वापर कसा करावा, बँडेजेसचे प्रकार व सुधारित बँन्डेजेस कशी तयार करावी, उपलब्ध साधनांपासून जखमींना वाहून नेण्याच्या विविध पद्धतींचे शिक्षण प्रात्यक्षिकांसह देण्यात आले.