Join us

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईची ‘रेकी’! आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 10:13 AM

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीबाबत २३ मे रोजी पालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती.

मुंबई : जोरदार पावसामुळे इमारत दुर्घटना, दरड कोसळणे, सखल भागांत पाणी साचणे, यासारखी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास सर्व संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज राहावे तसेच बचाव आणि मदतकार्य करताना योग्य समन्वय राखला जावा, यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन दिवस संबंधित यंत्रणांना एकत्र आणून विविध ठिकाणांची पाहणी (रेकी) करण्यात येत आहे. मुंबईतील १०५ पैकी काही ठिकाणांची पाहणी शुक्रवारी केली असून, उर्वरित ठिकाणांची शनिवारी करण्यात येणार आहे.

सैन्य दल, नौदल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) यांचे जवान, पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल, पालिकेचे विभागीय कार्यालय (वॉर्ड) आदींचे अधिकारी आणि कर्मचारी या पाहणीमध्ये सहभागी झाले आहेत. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती उद्भवल्यास आव्हानात्मक ठिकाणी मदतकार्य पोहोचविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूप आणि तत्काळ सुटका, कशी करता येईल, हा यामागील उद्देश आहे. 

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीबाबत २३ मे रोजी पालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती. त्यानुसार आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांशी पावसाळापूर्व तयारीसाठी समन्वय राखला जात असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी दिली होती.

वांद्रे, अंधेरी, मुलुंड येथे चाचपणी-

वांद्रे, अंधेरी, मुलुंड, बोरीवली, मालाड आदी परिसरांमध्ये शुक्रवारी पाहणी केल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. मुंबईतील चिंचोळ्या व घनदाट वस्तीच्या भागात मदतकार्य पोहोचविताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल तसेच आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचविण्यासाठीचे जवळचे आणि सुटसुटीत मार्ग कोणते, मदत कार्यासाठी वाहनांचे मार्ग कसे निवडायचे, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणेची सज्जता आदींची चाचपणीही यावेळी करण्यात आली.

टॅग्स :मुंबईनगर पालिकामोसमी पाऊसअग्निशमन दल