मुंबई : चर्चगेट स्थानकाजवळील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र अखेर प्रवाशांसाठी खुले करण्यात आले असून, त्यामुळे आता प्रवाशांना वैद्यकीय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ‘लोकमत’ने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करताच, खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मागील तीन महिन्यांपासून बंद असलेले आपत्कालीन वैद्यकीय केंद्र खुले केले आहे. शिवाय या आपत्कालीन वैद्यकीय केंद्रात रेल्वेकडून एका डॉक्टरचीही नेमणूक करण्यात आली आहे.रेल्वेतून प्रवास करताना अचानक प्रकृती खालाविल्यास किंवा रेल्वे दुर्घटनेत जखमी झाल्यास त्वरित उपचार मिळावेत, यासाठी रेल्वे स्थानकाजवळ आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू केली आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ असलेले आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद असल्याने तब्येत बिघडलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. ‘लोकमत’ने १५ एप्रिल रोजी ‘चर्चगेट रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद’ या शीर्षकाअंतर्गत वृत्त प्रसिद्ध करताच, प्रशासनाने याची दखल घेत, केंद्र सुरू केले आहे.दरम्यान, रेल्वे स्थानकाजवळ एका कोपऱ्यात हे आपत्कालीन वैद्यकीय केंद्र आहे. येथे केंद्र आहे, हे प्रवाशांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ते प्रवाशांच्या दृष्टीस पडेल, अशा ठिकाणी असावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
चर्चगेट स्थानकाजवळील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र अखेर झाले खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 6:36 AM