Join us  

ठाणे, पनवेल स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

By admin | Published: October 24, 2015 3:55 AM

अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ वैद्यकीत मदत मिळावी यासाठी मध्य रेल्वेकडून ठाणे, पनवेल स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहे. ठाणे स्थानकात

मुंबई : अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ वैद्यकीत मदत मिळावी यासाठी मध्य रेल्वेकडून ठाणे, पनवेल स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहे. ठाणे स्थानकात २२ आॅक्टोबरपासून हे कक्ष सुरु झाले आहे. तर पनवेल स्थानकात २६ आॅक्टोबरपासून कार्यान्वित होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वे अपघात झाल्यावर ताबडतोब उपचार न मिळाल्यामुळे काही प्रवाशांना प्राणास मुकावे लागते. ही परिस्थीती पाहता प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश न्यायालयाकडून रेल्वेला देण्यात आले होते. त्यानुसार गर्दीच्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कक्षात एक डॉक्टर, नर्स आणि मदतनीस असणार आहे. मध्य रेल्वेने आपल्या गर्दीच्या स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याची तयारी सुरु केली. यात प्रथम पनवेल आणि ठाणे स्थानकावर हे काम करण्यात आले. ठाणे स्थानकात वैद्यकीय कक्ष सुरु करण्यात आले असून पनवेल स्थानकात २६ आॅक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यानंतर आणखी नऊ स्थानकांवर ही सुविधा देण्यात येणार असून यामध्ये कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, दिवा, डोंबिवली, कल्याण कर्जत या मेन लाईनवरील तर हार्बरवरील वडाळा आणि वाशी स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे हद्दीत ट्रेनमधून किंवा ट्रेनचा धक्का लागून पडून जखमी झालेल्या व्यक्तींना या वैद्यकीय कक्षात उपचार देण्यात येतील.पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेन्ट्रल, बान्द्रा, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, वसई रोड, विरार व पालघर स्थानकातही हे कक्ष उभारण्यात येणार आहेत. मात्र पश्चिम रेल्वेकडून काढण्यात आलेल्या पहिल्या निविदेला काही महिन्यांपूर्वी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली आहे.