मुंबई : रेल्वे अपघातांमध्ये प्रवाशांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेने तब्बल २६ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनानंतर दुसºयाच दिवशी पश्चिम रेल्वेवरील तब्बल ३८ लाख प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय सोय उपलब्ध होणार आहे.
अपघातग्रस्त प्रवाशांना ‘गोल्डन अव्हर’मध्ये तातडीने उपचार मिळावेत, यासाठी रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेनुसार न्यायालयाने मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर रोज सरासरी १० ते १५ प्रवासी अपघातात जखमी होतात. यामुळे प्रत्येक स्थानकात अशी सुविधा उभारण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे.पश्चिम रेल्वेतर्फे २६ स्थानकांतील आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. १४ सप्टेंबर रोजी या निविदा खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. या कक्षातून जखमी रुग्णांसह सामान्य प्रवाशांवरदेखील त्वरित उपचार करण्यात येतील. त्याचबरोबर धावत्या लोकलमध्ये किंवा स्थानकावर गरोदर महिलेकडून बाळाला जन्म देण्याच्या घटनांमध्येही वैद्यकीय कक्षांची चांगली मदत होणार आहे.या स्थानकांत सुविधा उपलब्ध होणारचर्चगेट, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम जंक्शन, वांद्रे, खार रोड, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, राम मंदिर, गोरेगाव, मालाड, कांदिवली, सफाळे, पालघर, बोईसर, जोगेश्वरी, मीरा रोड, नायगाव, डहाणू रोड इत्यादी.