अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडेंनी बोलावली तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 01:04 PM2017-09-18T13:04:52+5:302017-09-18T13:05:05+5:30
मानधनवाढ आणि चांगल्या दर्जाचा पोषण आहार पुरवण्याच्या मागणीवर संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (18 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.
मुंबई, दि. 18 - मानधनवाढ आणि चांगल्या दर्जाचा पोषण आहार पुरवण्याच्या मागणीवर संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (18 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार असल्याने राज्यातील दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, मानधनवाढीचा प्रस्ताव शासन नियुक्त समितीने आधीच सादर केलेला आहे. प्रशासन सकारात्मक असतानाही मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी बंद ठेवत कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवला आहे. तरी या बैठकीला मुख्यमंत्री असणार की नाही?, याबाबत मुंडे यांनी कोणतीही कल्पना दिलेली नसल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.
संपात फूट पाडण्यासाठी सीईओंच्या नावे खोटी पत्रे
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेटर हेडचा वापर करत काही समाजकंटकांकडून संपात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कृती समितीच्या नेत्या कमल परूळेकर यांनी सांगितले. संप सुरू असतानाही संप मागे घेतल्याचा उल्लेख करत अभिनंदन करणारी लेटरहेडचा वापर केलेली खोटी पत्रे कर्मचाऱ्यांना पाठवली जात असल्याचा आरोप परूळेकर यांनी केला आहे. त्याची तक्रारही पोलिसांत केल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.