मुंबई - राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या पुरात लोकांची उभी पिकं नष्ट झाली, घरं कोसळली, संसार उघड्यावर आले. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते. यात नुकसानीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत केली जाईल असं सांगितलं होतं. अखेर राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पॅकेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 11,500 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या पॅकजेच विश्लेषण केलं असून केवळ 1500 कोटी रुपयेच तातडीची मदत उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे. 'कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने 11,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ 1500 कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते,'' असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलेले पॅकेज हे वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी असल्याचे म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्तांना मदत करू असे सांगितले होतं. पण त्यांनी पॅकेज घोषित केल्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. राज्याचे सरकार हे लुटो, बाटो आणि खाओ असे हे तिघाडी सरकार आहे. सरकारमध्ये पोलिसांच्या बदल्यामध्ये दलाली सुरू आहे, त्यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण झालाय, असेही शेलार यांनी म्हटलं.