नवी मुंबई : महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेमधील प्रशासकीय उदासिनतेविषयी नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सुसज्ज यंत्रणा असूनही त्याचा योग्य उपयोग होत नाही. आपत्ती निवारणासाठी ११ केंदे्र असली तरी नागरिकांना मात्र १०१ क्रमांकाचाच आधार वाटत आहे. पालिकेच्या आपत्ती नियंत्रण व्यवस्थेविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच नागरिकांनीही पालिकेच्या उदासिनतेविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. महानगरपालिकेने आपत्ती निवारणासाठी त्रिस्तरीय यंत्रणा तयार केली आहे. मुख्यालयात मुख्य नियंत्रण कक्ष, नेरूळ व बेलापूर अग्निशमन केंद्र व ८ विभाग कार्यालयात केंदे्र सुरू केली आहेत. पावसाळ्यात सर्व केंदे्र २४ तास सुरू ठेवण्यात येत आहेत. पाणी साचणे, अपघात, वृक्ष कोसळणे व इतर कोणतीही आपत्ती उद्भवली तर तत्काळ मदत करण्यासाठीची तयारी केली आहे. मुख्यालयाचे केंद्र हॉटलाईनद्वारे, जिल्हा व राज्याच्या आपत्कालीन कक्षाशीही जोडण्यात आले आहे. अत्याधुनीक यंत्रणा उपलब्ध केली आहे. परंतू ही यंत्रणा राबविण्यासाठी अधिकारी कर्मचारी तेवढ्या गांभीर्याने लक्ष देत नाहीत.शहरातील मुख्य आपत्कालीन कक्षाचे नंबर अद्याप सर्वांपर्यंत पोहचले नाहीत. सर्व ११ केंद्रांपैकी एकही ठिकाणचा नंबर पटकन लक्षात राहील असा नाही. नागरिकांपर्यंत सर्व माहिती पोहचविण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरले आहे. यामुळे कोणत्याही आपत्तीमध्ये या केंद्रांमध्ये शक्यतो कोणीही संपर्क करत नाही. आग लागली किंवा इतर काही घडले तर अग्निशमन दलाच्या १०१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा लागत आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व इतर सामाजीक कार्यकर्ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात व नंतर आपत्तीची माहिती संबंधीत कक्षाला मिळत आहे. चांगली यंत्रणा असतानाही तिचा चांगल्या पद्धतीने वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)
आपत्कालीनचा भरवसा फक्त १०१ क्रमांकावर !
By admin | Published: July 16, 2014 3:45 AM